कालबद्ध सेवा कायदा लवकर अमलात, अध्यादेश काढणार; मुख्यमंत्र्यांची सुशासन दिनी घोषणा 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 09:47 AM2023-12-26T09:47:23+5:302023-12-26T09:48:00+5:30

देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंतीदिन सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो.

timed service act to be implemented asoon ordinance to be enacted cm announcement on good governance day | कालबद्ध सेवा कायदा लवकर अमलात, अध्यादेश काढणार; मुख्यमंत्र्यांची सुशासन दिनी घोषणा 

कालबद्ध सेवा कायदा लवकर अमलात, अध्यादेश काढणार; मुख्यमंत्र्यांची सुशासन दिनी घोषणा 

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी : गेल्या दहा वर्षांत अंमलबजावणी न झालेल्या गोवा कालबद्ध सार्वजनिक सेवा कायद्याच्या अंमलबजावणीसाठी लवकरच अध्यादेश जारी केला जाईल, असे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी जाहीर केले आहे.

देशाचे माजी पंतप्रधान स्व. अटल बिहारी वाजपेयी यांचा जयंतीदिन सुशासन दिवस म्हणून साजरा केला जातो. मंत्रालयात व नंतर भाजप मुख्यालयात वाजपेयी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली वाहून अभिवादन केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी ही माहिती दिली. लोकांना विशिष्ट काळाच्या मुदतीत सार्वजनिक स्वरूपाच्या सेवा देण्यासाठी भाजप सरकारने कालबद्ध सार्वजनिक सेवा कायदा आणला होता. माजी मुख्यमंत्री स्व. मनोहर पर्रीकर यांच्या सरकारने मे २०१३ मध्ये हे विधेयक विधानसभेत मंजूर केले होते. 

या कायद्याअंतर्गत नागरिकांना सार्वजनिक सेवा ठरावीक दिवसांच्या मुदतीत मिळविण्याचा अधिकार आहे. त्यामुळे एखाद्याचा अर्ज विनाकारण रखडून ठेवणाऱ्या अधिकाऱ्याला दंड ठोठावण्याची तरतूद या कायद्यात आहे. अर्ज अपूर्ण असेल तर त्यावर तसा शेरा मारून तो निकालात तरी काढला पाहिजे, परंतु कोणत्याही परिस्थितीत फाईल रखडून ठेवता येत नाही. मात्र, या कायद्याची आतापर्यंत अंमलबजावणी झालीच नाही.

याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, एक अध्यादेश जारी करून ही सुविधा लवकरच लोकांसाठी उपलब्ध केली जाईल. या कायद्याची अंमलबजावणी सुरू केली जाईल. गोवा विधानसभा अधिवेशनापर्यंत हे काम केले जाईल, असे त्यांनी सांगितले.

प्रशासनात सुशासन आणण्याचा पाया स्व. वाजपेयी यांच्या सरकारने घातला. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर कळस चढवीत आहेत, असेही त्यांनी सांगितले. गोव्यात त्याची अंमलबजावणी करताना कित्येक सार्वजनिक सेवा सोप्या आणि सुटसुटीत करताना त्या ऑनलाइन करण्यात आल्या आहेत, असेही ते म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक, पक्षाचे अध्यक्ष खासदार सदानंद शेट तानावडे आणि इतर मान्यवर उपस्थित होते.

 

Web Title: timed service act to be implemented asoon ordinance to be enacted cm announcement on good governance day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.