व्हीलचेअरसाठी ‘टीप’ भोवली; पैसे न दिल्यास मधेच सोडून जाण्याची धमकी, तिघांवर कारवाई
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2023 02:01 PM2023-02-08T14:01:51+5:302023-02-08T14:02:40+5:30
लंडनला जाणाऱ्या ज्येष्ठ महिला प्रवाशाकडे ४००० रुपयांची टीप मागणे दाबोळी विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क वास्को: लंडनला जाणाऱ्या ज्येष्ठ महिला प्रवाशाकडे ४००० रुपयांची टीप मागणे दाबोळी विमानतळावरील तीन कर्मचाऱ्यांना महागात पडले आहे. याबाबत झालेल्या तक्रारीनंतर यापैकी एक कर्मचाऱ्याला बडतर्फ करण्यात आले आहे. तर दोघांचा विमानतळात प्रवेश करणारा 'पास' (परवाना) काढून घेण्यात आलेला आहे.
२९ जानेवारी रोजी दाबोळी विमानतळावरून 'टू एअरवेज'मधून लंडनला जाणाऱ्या कॅथरीन वूल्फ या ६२ वर्षीय महिलेने 'व्हीलचेअर'ची मागणी केली होती. या महिलेकडे संबंधित कामगारांनी चार हजार रुपये 7 'टीप' मागितली. पर्याय नसल्याने वूल्फ यांनी कर्मचाऱ्यांना पैसे दिले. लंडनला न पोहोचल्यानंतर या महिलेने ईमेलद्वारे दाबोळी विमानतळ प्राधिकरण आणि गोवा पोलिसांकडे तक्रार केली. त्यानंतर या प्रकरणी चौकशी सुरू झाली. संबंधित तीन कामगारांना कामावरून काढून टाकण्यात आल्याचे मंगळवारी सूत्रांनी सांगितले.
चालण्याची समस्या असल्याने कॅथरीन यांनी 'व्हीलचेअर' मागवली होती. विमान कंपनीने त्यांना 'व्हीलचेअर' व दोन कामगार उपलब्ध करून दिले. या कामगारांनी विमानतळावर आत गेल्यानंतर एका ठिकाणी थांबून कामगारांनी कॅथरीन यांच्याकडे ४००० रुपये 'टीप' मागितली. पैसे न दिल्यास तुम्हाला येथेच सोडून जाऊ, अशी धमकीही दिली. विमान सुटण्याच्या भीतीने कॅथरीन यांनी पैसे दिले. लंडनला पोहोचल्यानंतर त्यांनी 'ईमेल' द्वारे दाबोळी विमानतळ प्राधिकरण आणि गोवा पोलिसांकडे तक्रार केली. प्राधिकरणाने 'सीसीटीव्ही फुटेज' तपासले तेव्हा कॅथरीन यांच्याशी काहीजण चर्चा करताना दिसले.
दिव्यांग व्यक्तीकडे अशा प्रकारे वागणे चुकीचे आहे
'दिव्यांग ज्येष्ठ महिला प्रवाशाबाबत घडलेल्या घटनेसंबंधी विमानतळ प्राधिकरणाकडे स्पष्टीकरण मागितले जाईल. दिव्यांग व्यक्तीकडे अशा प्रकारे वागणे चुकीचे आहे. व्हीलचेअरवरून नेण्यासाठी टीप मागणे तर गैर आहे. अशा प्रकारची पुनरावृत्ती घडता कामा नये, दाबोळी विमानतळावर लंडनला जाणाऱ्या ज्येष्ठ महिलेच्या बाबतीत जो प्रकार घडला तो निंदनीय आहे. मुख्यमंत्री याबाबतीत विमानतळ प्राधिकरणाकडे स्पष्टीकरण मागतील. चौकशीत काय ते निष्पन्न होईल.' -सुभाष फळदेसाई, समाजकल्याणमंत्री
सीसीटीव्ही फुटेज तपासले
व्हीलचेअरसाठी पैसे मागितल्याची तक्रार आल्यावर आम्ही सीसीटीव्ही फुटेज तपासले. त्यात त्या महिलेशी तिघे जण चर्चा करताना दिसून आले. ते विमानतळ प्राधिकरणाचे कामगार नसून ग्राउंड हँडलिंग स्टाफचे कर्मचारी असल्याचे उघड झाले. त्यानंतर आम्ही त्यांच्यावर योग्य कारवाईबाबत संबंधितांना कळवले. याप्रकरणी एकाला कामावरून काढले असून दोघांचा विमानतळात प्रवेश करणारा पास (परवाना) काढून घेण्यात आलेला आहे. -धनंजय राव, संचालक, दाबोळी विमानतळ
चौकशीनंतर योग्य कारवाई करू
संबंधित महिलेने 'ईमेल द्वारे तक्रार केली. ती घटना दाबोळी विमानतळाच्या आत घडली असून तेथे केंद्रीय सुरक्षा औद्योगिक दलाचे जवान काम पाहतात. संबंधित विभागाला 'सीसीटीव्ही फुटेज साठी पत्र दिले आहे. कामगारांची माहिती मागवली आहे. चौकशीनंतर योग्य कारवाई करू. -सलीम शेख, पोलिस उपाधीक्षक, मुरगाव
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"