नेत्यांची तिरंगा यात्रा जोरात; जागृतीसाठी बाईक रॅली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2024 08:30 AM2024-08-12T08:30:12+5:302024-08-12T08:32:15+5:30
काही भागांत खड्डेमय रस्त्यांचाही अनुभव
लोकमत न्यूज नेटवर्क पणजी: भारतीय जनता पक्षाने लोकांना १३ ते १५ ऑगस्टदरम्यान प्रत्येक घरावर तिरंगा फडकविण्याचे आवाहन केले आहे. येत्या स्वातंत्र्यदिनी किमान एक लाख घरांवर तिरंगा फडकणार आहे. यासाठीच्या जनजागृतीपर 'हर घर तिरंगा' मोहिमेसाठी राज्यातील काही भागात रविवारी मुख्यमंत्र्यांसह इतर नेत्यांनी कार्यकर्त्यांसह बाईक रॅली काढली.
यानिमित्ताने भाजपाचे अनेक मंत्री, आमदार बुलेटवरून फिरले. यावेळी नेत्यांना रस्त्यांची सद्यस्थिती लक्षात आली. अनेक रस्त्यांवरील खड्डे आणि त्यातून वाट काढण्यासाठी जनतेला रोज करावी लागणारी कसरत याचेही दर्शन या निमित्ताने झाल्याच्या प्रतिक्रिया लोकांनी व्यक्त केल्या. अजून काही नेत्यांनी या यात्रा काढायच्या आहेत. या रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे त्यांनी त्या टाळल्याचे सांगितले जाते. मात्र पुढील दोन दिवसांत त्यांना त्या पूर्ण कराव्याच लागणार आहेत.
साखळी येथे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे बाइक रॅलीत सहभागी झाले. पर्वरी मतदारसंघातील बाईक रॅलीत पर्यटनमंत्री तथा आमदार रोहन खंवटे समर्थकांसमवेत सहभागी झाले होते. तर वास्कोमध्ये आमदार संकल्प आमोणकर यांच्या उपस्थितीत निघालेल्या रॅलीमध्येही मुख्यमंत्र्यांचा समावेश होता. डिचोली येथे आमदार डॉ. चंद्रकांत शेटये हे कार्यकर्त्यांच्या बाईक रॅलीत सहभागी झाले. आमदार प्रेमेंद्र शेट यांनी मये मतदारसंघात हर घर तिरंगा जागृती रॅली काढली. दिगंबर कामत मडगावमधील रॅलीत सहभागी झाले होते. येत्या दोन दिवसांत इतर नेतेही आपापल्या भागात रॅली काढतील.