आजच्या युवकांनी बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श बाळगावा: कृषी मंत्री नाईक
By आप्पा बुवा | Published: April 14, 2023 05:51 PM2023-04-14T17:51:34+5:302023-04-14T17:51:41+5:30
फोंडा नगरपालिकेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
फोंडा - एका गरीब कुटुंबात जन्माला येऊन , समोर असलेल्या परिस्थितीशी दोन हात करत, त्याकाळी बॅरिस्टर पदवी मिळवणारे बाबासाहेब आंबेडकर हे समस्त युवा पिढीसाठी आदर्श असून, जीवनात जर उच्च पदावर पोहोचायचे असेल तर प्रत्येक युवकांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा आदर्श बाळगावा. असे आवाहन कृषिमंत्री रवी नाईक यांनी केले. फोंडा नगरपालिकेने डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते.
नगरपालिका उद्यानात असलेल्या डॉ.आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून यावेळी त्यांनी आदरांजली वाहिली. नगराध्यक्ष रितेश नाईक, नगरसेवक आनंद नाईक , नगरपालिकेचे पदाधिकारी , कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रवी नाईक पुढे म्हणाले की 'भारत स्वतंत्र झाल्यानंतर भारतीय राज्यघटना निर्माण करण्याची जबाबदारी तत्कालीन सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे दिली तिथेच परिवर्तनाची ताकद लोकांना कळून चुकली. अन्याय विरुद्ध लढण्याची ताकद डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी तळागाळातील लोकांमध्ये निर्माण केली. त्यांच्यामुळेच तर तळागाळातील खितपत पडलेल्या लोकांमध्ये नवीन चेतना निर्माण झाली व त्यांनी आज समाज उभारण्याचा कामगिरीत महत्त्वाचे योगदान दिले आहे.