शिखाची कमाल, गोव्याची धमाल, मध्य प्रदेशवर ६ विकेट्सनी मात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2018 08:40 PM2018-01-17T20:40:55+5:302018-01-17T20:41:07+5:30
गोव्याच्या महिला संघाने आपली विजयी मोहीम मोठ्या दिमाखात सुरू ठेवली. पर्वरीच्या क्रिकेट स्टेडियमवर गोव्याने मध्य प्रदेशचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला.
पणजी - गोव्याच्या महिला संघाने आपली विजयी मोहीम मोठ्या दिमाखात सुरू ठेवली. पर्वरीच्या क्रिकेट स्टेडियमवर गोव्याने मध्य प्रदेशचा ६ विकेट्सनी धुव्वा उडवला. बीसीसीआय आयोजित महिला टी-२० क्रिकेट चषकातील या सामन्यात पुन्हा चमकली ती गोव्याची कर्णधार शिखा पांडे. शिखाने ५५ धावांची नाबाद खेळी केली. तिच्या या खेळीच्या जोरावर गोव्याने मध्य प्रदेशचे ७५ धावांचे आव्हान गाठले. १५.५ षटकांत ४ गडी गमावून गोव्याने आपला विजय साकारला. आता एलिट अ गटात गोवा संघ ३ विजय आणि १२ गुणांसह दुसºया क्रमांकावर आहे.
सामन्यात गोव्याने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला. खेळपट्टीचा पूर्ण अंदाज आल्यानेच शिखाने पाहुण्या संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केले. रणनीतीनुसार गोलंदाजांनीही योगदान दिले. पहिल्याच षटकात सलामीवीर कल्पना यादव हिला स्वत: शिखाने बाद केले. तिचा भेदक चेंडू कल्पना हिला कळलाच नाही. पायचितचे अपिल करताच पंचांनी हवेत बोट दाखवले आणि गोव्याच्या गोटात आनंद साजरा झाला. त्यानंतर संतोषी राणे हिने चारू जोशी (२) आणि प्रीती यादव (१४) या दोघींना तंबूचा रस्ता दाखवला. तमन्ना निगम (२) हीसुद्धा झटपट बाद झाली. त्यामुळे मध्य प्रदेश संघ ४ बाद २१ अशा संकटात सापडला. नंतर पल्लवी भारद्वाज (२५) आणि कर्णधार निधी बुले (२७) यांनी मध्य प्रदेशचा डाव सावरला. या दोघींनी पाचव्या गड्यासाठी अर्धशतकीय भागीदारी केली. चोरटी धाव घेण्याच्या नादात पल्लवी बाद झाली. तिला निकिताने धावबाद केले. मध्य प्रदेशने २० षटकांत ५ बाद ७५ धावांपर्यंत मजल मारली. गोव्याकडून संतोषी राणे हिने २ तर शिखा पांडे आणि निकिता मलिक यांनी प्रत्येकी एक गडी बाद केला.
प्रत्युत्तरात, गोव्याची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर संजुला नाईक ५ धावांवर बाद झाली. एका बाजूने कर्णधार शिखा पांडे ही चांगली खेळत होती. तर दुसºया बाजूने गोव्याचे फलंदाज एकापाठोपाठ एक असे बाद होत होते. भरवशाची सुनंदा येत्रेकर (०), निकिता मलिक (४) या झटपट बाद झाल्या. त्यामुळे गोवा संघ २ बाद १६ अशा स्थितीत होता. कर्णधार शिखाने संयमी खेळासह शानदार फटकेबाजी केली. तिने ९ चौकारांच्या मदतीने आपले अर्धशतक पूर्ण केले. ५४ चेंडूंत ५५ धावांची नाबाद खेळ करीत शिखाने एकतर्फी झुंज दिली. विनवी गुरव (१२) हिने तिला साथ दिली. इतर फलंदाज मात्र अपयशी ठरले. मध्य प्रदेशकडून तमन्ना निगम हिने २ बळी घेतले.
संक्षिप्त धावफलक - मध्य प्रदेश २० षटकांत ५ बाद ७५. (फलंदाजी- प्रीती यादव १४, पल्लवी भारद्वाज २५, निधी बुले नाबाद २७. गोलंदाजी-शिखा पांडे ४-१२-१५-१, संतोषी राणे ४-२०-७-२, निकिता मलिक ३-१५-७-१. गोवा १५.५ षटकांत ४ बाद ७७. फलंदाजी-शिखा पांडे नाबाद ५५ (५४ चेंडू, ९ चौकार), विनवी गुरव १२. गोलंदाजी- तमन्ना निगम ४-१८-६-२.