उत्कर्षाचे विषय कीर्तनातून होतात स्पष्ट: सुभाष शिरोडकर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2024 08:18 AM2024-05-24T08:18:17+5:302024-05-24T08:18:49+5:30
निवासी कीर्तन शिबिर
लोकमत न्यूज नेटवर्क, फोंडा : कीर्तन हा सर्वश्रेष्ठ भारतीय संस्कृतीच्या परंपरेतील एक भाग आहे. जीवनात कोणत्याही पैलूचे आणि समाजाच्या उत्कर्षाचे विषय हे कीर्तनातून मांडले जातात. कीर्तनातून संस्कार होतात, ते सर्वांनी आत्मसात केले पाहिजेत. गोव्यातील प्रसिद्ध कीर्तनकार सुहासबुवा वझे मागील अनेक वर्षांपासून समाजातील विविध बाल कीर्तनकारांना घडवण्याचे काम करत आहेत, असे उद्गार सहकारमंत्री सुभाष शिरोडकर यांनी काढले.
चिकणगाळ शिरोडा येथील शांताप्रसाद अद्वैतानंद सभागृहात आयोजित केलेल्या ३३ व्या निवासी कीर्तन संस्कार शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यात सुभाष शिरोडकर बोलत होते. हे शिबिर गोमंतक संत मंडळ, संचालित कीर्तन विद्यालय, फोंडा यांच्या संयुक्त विद्यामाने आयोजित करण्यात आले होते.
यावेळी कार्यक्रमात समाजसेवक जयंत मिरिंगकर, कीर्तनकार सुहासबुवा वझे, गोमंतक साहित्य सेवक मंडळाचे अध्यक्ष रमेश वंसकर, दीपा मिरिंगकर, संजय घाटे, रतनजी बेतकीकर, दामोदर कामत उपस्थित होते.
यावेळी जयंत मिरिंगकर म्हणाले, हिंदू एकता, हिंदू धर्म संस्कार देणाऱ्या कीर्तन शिबिराला माझे नेहमीच सहकार्य मिळेल. शांताप्रसाद अद्वैतानंद समाधी न्यास, अशा कामात नेहमीच पुढे आहे. यावेळी सुभाष शिरोडकर यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले, तसेच गोव्यातील ज्येष्ठ संगीतकार रतनजी बेतकीकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सुहासबुवा वझे यांनीही आपले विचार मांडले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन दीपा मिरिंगकर यांनी केले, तर आभार दामोदर कामत यांनी मानले.