गोव्यात मासळी आयातीवर सहा महिन्यांकरिता पूर्ण बंदी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 10, 2018 06:57 PM2018-11-10T18:57:02+5:302018-11-10T18:57:10+5:30
गोवा सरकारने आयात मासळीवर सहा महिन्यांकरिता पूर्ण बंदी घातली असून गरज पडल्यास पुढेही आणखी सहा महिन्यांनी बंदीकाळ वाढविला जाणार आहे.
पणजी : गोवा सरकारने आयात मासळीवर सहा महिन्यांकरिता पूर्ण बंदी घातली असून गरज पडल्यास पुढेही आणखी सहा महिन्यांनी बंदीकाळ वाढविला जाणार आहे. आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांनी ही घोषणा करताना सोमवारी खात्याचा आदेश जारी होईल, असे सांगितले.
गेले काही दिवस गाजत असलेल्या फॉर्मेलिन वादाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला. क्वालिटी इन्स्पेक्शनची कौन्सिलची प्रयोगशाळा गोव्यात स्थापन झाल्यावर आयात मासळी तपासण्याची पूर्ण व्यवस्था झाल्यानंतरच आयातबंदी उठविली जाईल. नंतर मासळीची तपासणी एफडीए करणार नाही तर आंतरराष्ट्रीय एजन्सीच तपासणी करणार आहे, असे मंत्र्यांनी स्पष्ट केले.
परराज्यातून गोव्यात मासळी आयात करणाऱ्या व्यापाºयांना त्यांच्या संबंधित राज्यांमध्ये एफडीएकडे नोंदणी तसेच इन्सुलेटेट वाहन सक्तीचे करण्यात आले होते. तशी मार्गदर्शक तत्त्वेंही सरकारने जारी केली होती परंतु एकाही मासळी व्यापाºयाने नोंदणी केलेली नाही. कहर म्हणजे आंतरराज्य बसगाड्यांमधून छुप्या पध्दतीने मासळी आयात सुरु झाली. शनिवारी असाच एक प्रकार घडला. मुंबईहून जीए-0३-एन-५६७0 क्रमांकाच्या खाजगी लक्झरी बसमधून मासळीच्या पेट्या आणण्यात आल्या. मेरशी येथे या पेट्या उतरविण्यात आल्या. एफडीए अधिकाºयांनी मासळीच्या पाच पेट्या जप्त केल्या तसेच जुने गोवे पोलिसांनी चौकशी सुरु केली आहे. ही बस कोलवाळ येथील मंदार अजित पार्सेकर यांच्या मालकीची असून मुंबई येथील प्रताप संपद मोरे नामक व्यक्तीने सावंतवाडी येथील डॉमनिक डिसोझा याच्यासाठी ही मासळी भरली होती व ती म्हापसा येथे उतरविण्यात येणार होती. आंतरराज्य बसगाड्यांमधूनही मासळी आयात सुरु झाल्याने खळबळ उडाली.
यापुढे आंतरराज्य बसगाड्यांचीही कडक तपासणी करण्यात येणार असून एफडीए, पोलिस अधिकारी बसमालक तसेच मासळी आणणाºयाविरुध्द गुन्हे नोंदवून कारवाई करतील, असे राणे यांनी स्पष्ट केले. आयात मासळीमध्ये फॉर्मेलिन रसायन सापडल्याने गेल्या जुलैमध्ये राज्यात खळबळ उडाली होती. हे रसायन मानवी मृतदेह टिकून रहावा यासाठी पार्थिवावर लावले जाते. हे रसायन माणसाने सेवन केल्यास दुर्धर रोग जडण्याचा धोका असतो त्यामुळे मासळी खरेदी करताना आजही गोवकर धास्ती बाळगून आहेत.
गोव्यात शेजारी महाराष्ट्र, कर्नाटक, तामिळनाडू, आंध्रप्रदेश, केरळमधून मोठ्या प्रमाणात मासळी आयात केली जात होती.