दीपावली निमित्त गोव्यात पर्यटन हंगामाला जोर
By ऑनलाइन लोकमत | Published: October 17, 2017 12:39 PM2017-10-17T12:39:13+5:302017-10-17T12:39:38+5:30
दीपावली सणानिमित्ताने गोव्यातील पर्यटन हंगामाने जोर धरायला सुरुवात झाली आहे. शाळांना पडलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटन हंगाम फुलायला लागला आहे. असंख्य पर्यटक दीपावली साजरी करण्यासाठी तसेच दीपावलीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत.
म्हापसा - दीपावली सणानिमित्ताने गोव्यातील पर्यटन हंगामाने जोर धरायला सुरुवात झाली आहे. शाळांना पडलेल्या सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्यातील पर्यटन हंगाम फुलायला लागला आहे. असंख्य पर्यटक दीपावली साजरी करण्यासाठी तसेच दीपावलीचा आनंद लुटण्यासाठी गोव्यात दाखल झाले आहेत.
दीपावलीच्या आदल्या दिवशी अर्थात आज राज्यभरात नरकासूराच्या प्रतिमेचे दहन करण्याची प्रथा गोव्यात आहे. वेगवेगळ्या आकर्षक अशा आकाराचे नरकासूर बनवले जातात. विविध ठिकाणी स्पर्धांचेही आयोजन केले जाते. ते पाहण्यासाठी स्थानिकांसोबत मोठ्या प्रमाणावर पर्यटकांचीही गर्दी होत असते. शहरासोबत गावातही नरकासूराच्या प्रतिमा मोठ्या प्रमाणावर तयार करुन लोकांच्या प्रदर्शनासाठी ठेवल्या जातात. सोबत संगीताची साथ संगत जोडली जाते. रात्री जागवून तयार केलेल्या या प्रतिमा मध्यरात्रीनंतर जाळल्या जातात.
आकर्षक असे बनवलेले नरकासूर पाहण्यासाठी, दीपावली साजरी करण्यासाठी तसेच गोव्यात सुट्टीचे दिवस घालवण्यासाठी पर्यटक मोठ्या प्रमाणावर गोव्यात दाखल झाले आहेत. विविध मार्गातून गोव्यात पर्यटक दाखल झाले असले तरी जास्त प्रमाणावरील पर्यटक खासगी वाहनांचा वापर करुन आले आहेत. आलेल्या पर्यटकांकडून अॅडव्हान्स हॉटेल्स बुकिंग केली गेली आहेत. त्यामुळे हॉटेल्स फुल्ल व्हायला सुरुवात झाली आहे.
दीपावलीचा आनंद लुटण्यासोबत काही दिवस गोव्यात सुट्टी साजरी करण्यासाठी जास्त प्रमाणावरील पर्यटक आल्याने किनारी भागातील हॉटेल्समध्ये वास्तव्य करण्यावर भर देण्यात आला आहे. आलेल्या पर्यटकांमुळे शॅक व्यवसायाला गती मिळणार आहे. दिवाळीपासून पर्यटन हंगामाला सुरुवात होत असल्याने शॅक उभारणीचे काम पूर्णत्वाकडे आले आहे. काहींनी आपल्या व्यवसायाला सुद्धा सुरुवात केली आहे.
पर्यटकांची वाढती संख्या लक्षात घेऊन तसेच कायदा व सुव्यवस्थेवर नियंत्रण ठेवण्यासाठी सुरक्षा व्यवस्थेत सुद्धा वाढ करण्यात आली आहे. महत्त्वाच्या ठिकाणी तसेच किनारी भागात पोलीस तैनात करण्यात आल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे. तसेच पोलिसांच्या गस्तीतही वाढ करण्यात आली आहे.