टॅक्सी व्यवसायात येणाऱ्यांना पर्यटन महामंडळ कर्ज देणार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2019 04:16 PM2019-06-19T16:16:53+5:302019-06-19T16:17:07+5:30
पणजी : राज्यातील जे कुणी टॅक्सी व्यवसायात येऊ पाहत आहेत, त्यांना वाहन खरेदीसाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून (जीटीडीसी) कर्ज ...
पणजी : राज्यातील जे कुणी टॅक्सी व्यवसायात येऊ पाहत आहेत, त्यांना वाहन खरेदीसाठी गोवा पर्यटन विकास महामंडळाकडून (जीटीडीसी) कर्ज दिले जाणार आहे. तसेच टॅक्सी व्यवसायिकांच्या मुलांसाठी शिष्यवृत्ती योजना राबवली जाणार आहे.
गोवा माईल्स नावाच्या अॅपआधारित टॅक्सी सेवेला गोव्यातील काही टॅक्सी व्यवसायिक विरोध करत आहेत. तो विरोध निराधार आणि अत्यंत चुकीचा आहे, अॅपआधारित टॅक्सी सेवा ही गोव्याची गरज आहे, असे पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमन व आमदार दयानंद सोपटे येथे पत्रकारांशी बोलताना म्हणाले. गोवा माईल्स टॅक्सी सेवा ही गोमंतकीय टॅक्सी व्यवसायिकांच्या विरोधात नाही. केवळ पन्नास टॅक्सी घेऊन गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यातच गोवा माईल्सची अॅपआधारित टॅक्सी सेवा सुरू झाली होती. गोमंतकीय प्रवाशांनी आणि पर्यटकांनी या सेवेचे स्वागत केले. मोठा प्रतिसाद दिला. त्यामुळे आता गोवा माईल्सच्या टॅक्सी सेवेमध्ये एकूण 1 हजार 450 टॅक्सींची नोंद आहे. या सर्व टॅक्सींचे मालक हे गोमंतकीय आहेत. उर्वरित गोमंतकीय टॅक्सी व्यवसायिकांनीही या सेवेत सहभागी व्हावे. अॅपआधारित टॅक्सी सेवा पारदर्शक आहे, असे सोपटे म्हणाले. यावेळी पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक निखिल देसाई हेही उपस्थित होते.
गोव्यातील जे बेरोजगार तरुण टॅक्सी विकत घेऊ पाहत आहेत, त्यांना आम्ही गोवा आर्थिक विकास महामंडळामार्फत (ईडीसी) कर्ज उपलब्ध करून देऊ. तसेच वाहनाच्या विम्यावर पन्नास टक्के अनुदान देऊ. टॅक्सी व्यवसायिक हे गरीब किंवा मध्यमवर्गीय कुटूंबातून येतात. त्यांच्या मुलांना आम्ही शिष्यवृत्ती देऊ. या टॅक्सींची नोंदणी मात्र गोवा माईल्स अॅपसेवेंतर्गत करावी लागेल. गोवा माईल्सच्या सेवेखाली त्यांना काम करावे लागेल. त्यात त्यांनाही फायदाच आहे. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी घेतलेल्या बैठकीत जीटीडीसीने टॅक्सी व्यवसायिकांसाठी योजना राबवाव्यात असे ठरले आहे. गोव्यातील जे थोडे टॅक्सी व्यवसायिक गोवा माईल्स सेवेला विरोध करत आहेत, त्यांच्याशी आपणही चर्चा केली आहे. माङया मांद्रे मतदारसंघातील अनेक टॅक्सी व्यवसायिकांना या सेवेचे महत्व पटले आहे, असे सोपटे यांनी नमूद केले.