पर्यटन महामंडळ आमदार निलेश काब्राल यांच्याकडेच राहणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 2, 2018 09:01 PM2018-10-02T21:01:57+5:302018-10-02T21:02:10+5:30
पर्यटन विकास महामंडळ हे शेकडो कोटींचे महत्त्वाचे प्रकल्प व उपक्रम राबवत असून या महामंडळाचे चेअरमनपद हे कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांच्याकडेच राहील अशी माहिती सरकारच्या उच्चस्तरीय सुत्रांकडून मिळाली आहे.
पणजी : पर्यटन विकास महामंडळ हे शेकडो कोटींचे महत्त्वाचे प्रकल्प व उपक्रम राबवत असून या महामंडळाचे चेअरमनपद हे कुडचडेचे आमदार निलेश काब्राल यांच्याकडेच राहील अशी माहिती सरकारच्या उच्चस्तरीय सुत्रांकडून मिळाली आहे. हे महामंडळ काब्राल यांच्यात ताब्यात राहावे असे भाजपानेही ठरवले आहे. यामुळे जे आमदार पर्यटन महामंडळावर डोळा ठेवून आहेत त्यांचा अपेक्षाभंग होण्याची मोठी शक्यता आहे.
पर्यटन खाते यावेळी भाजपाच्या मंत्र्याकडे नाही. त्यामुळे निदान पर्यटन महामंडळ तरी भाजपाच्या मंत्र्याकडे असावे असे भाजपाशीसंबंधित मंडळींना वाटते. पर्यटन महामंडळ हे राज्यातील विविध शासकीय मालमत्ता लीजवर देणे, विविध प्रकारची कंत्राटे देण्यासाठी निविदा जारी करणे, पर्यटन क्षेत्रात विविध बांधकामे करून घेणे असे काम करते. शेकडो कोटींचे व्यवहार या महामंडळातर्फे केले जात आहेत. एवढय़ा महत्वाच्या महामंडळाचे चेअरमनपद काब्राल यांनी सोडू नये असे काब्राल यांचे हितचिंतक असलेल्या भाजपामधील अनेक जणांना वाटते. लोकसभा निवडणुका होईपर्यंत तरी काब्राल हे स्वत:ही पर्यटन महामंडळाचे चेअरमनपद सोडणार नाहीत, असे सुत्रांनी सांगितले. पर्यटन मंत्री बाबू आजगावकर व मंत्री काब्राल यांच्यात चांगले संबंध नाहीत. मात्र काब्राल हे सरकारमधील कुणाला जास्त उपद्रवीही ठरत नाहीत. पर्यटन हे भाजपासाठी नेहमी आकर्षक क्षेत्र राहिले आहे. पूर्वी पर्यटन खात्याच्या मंत्रीपदी असताना दिलीप परुळेकर हे भाजपाच्या खूप विश्वासातील झाले होते. आता काब्राल हे भाजपासाठी खूप विश्वासातील आहेत.
दरम्यान, प्रसाद गावकर, राजेश पाटणोकर, ग्लेन तिकलो असे काही आमदार पर्यटन विकास महामंडळाचे चेअरमनपद मिळावे अशी अपेक्षा ठेवून असल्याचे सुत्रांनी सांगितले. मगोपचे दिपक प्रभू पाऊसकर यांना देखील या महामंडळाची अपेक्षा होती. तथापि, जीटीडीसी काब्राल देणार नाहीत याची कल्पना आता पाऊसकर यांनाही आली असल्याचे कळते.