पर्यटन खात्याचा रिल्सच्या माध्यमातून गोवा दर्शनचा मानस; खास अल्टीमेट रील शोडाऊन स्पर्धेचे आयोजन

By समीर नाईक | Published: January 19, 2024 01:38 PM2024-01-19T13:38:18+5:302024-01-19T13:38:57+5:30

गोवा पर्यटन खात्यातर्फे अल्टीमेट रील शोडाऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

Tourism Department intention to see Goa through Reels Organizing a special Ultimate Reel Showdown tournament | पर्यटन खात्याचा रिल्सच्या माध्यमातून गोवा दर्शनचा मानस; खास अल्टीमेट रील शोडाऊन स्पर्धेचे आयोजन

पर्यटन खात्याचा रिल्सच्या माध्यमातून गोवा दर्शनचा मानस; खास अल्टीमेट रील शोडाऊन स्पर्धेचे आयोजन

पणजी: गोवा पर्यटन खात्यातर्फे अल्टीमेट रील शोडाऊन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील कमी ज्ञात आणि वैविध्यपूर्ण पैलूंचे प्रदर्शन करण्याची एक रोमांचक संधी आहे. या स्पर्धेचा उद्देश राज्यातील जगप्रसिद्ध समुद्रकिनाऱ्यांच्या पलीकडे जाऊन, सांस्कृतिक वारसा, नैसर्गिक सौंदर्य, आणि राज्याला खरोखरच खास बनवणाऱ्या साहसी संधी समोर आणणे आहे. शुक्रवारपासून या स्पर्धेचे ऑनलाईन पध्दतीने सुरुवात झाली असून, अनेक जणांनी यासाठी उत्सुकता दाखवली आहे.

राज्याचे सार टिपणाऱ्या अनोख्या विषयांवर रील करण्यासाठी सहभागींना प्रोत्साहित केले जाणार आहे. राज्यातील अध्यात्मिक पर्यटन, होम स्टे, समुद्रकिनार्यांच्या पलीकडील गोवा, निसर्ग आणि पारंपारीक पाककृती या विषयांवर सहभागी होऊ इच्छिणाऱ्या स्पर्धक रील्स तयार करू शकतात. या स्पर्धेमुळे स्पर्धकांना राज्यात असलेल्या दुर्लक्षित संसाधनाची सखोल माहिती मिळेल सोबत राज्याचे वैविध्यपूर्ण सौंदर्य जगाला दाखविणारी आकर्षक कलाकृती तयार होईल.

अल्टिमेट रील शोडाउन स्पर्धा सर्व वयोगटातील सहभागींसाठी खुली आहे. सर्जनशीलता आणि अस्सलपणा, व्हिडीओची सुस्पष्ट आणि गुणवत्ता, विषयाचे अनुसरून रीलची निर्मिती, लाईक्स, कमेंट्स, शेअर्स आणि रिच या सर्व निकषांवर तज्ज्ञ परीक्षकांची समिती स्पर्धेचे मूल्यांकन करतील. स्पर्धेतून ३ विजेते निवडले जातील. प्रथम क्रमांकासाठी १ लाख रुपये, द्वितीय क्रमांकासाठी ५० हजार रुपये व तृतीय क्रमांकासाठी २५ हजार रुपये रोख रक्कम बक्षिस स्वरुपात देण्यात येईल.

#TheReelGoa हा अधिकृत हॅशटॅग वापरून दिलेल्या विषयांवर आधारित ६०-९० सेकंदाचा व्हिडिओ तयार करून स्पर्धक स्पर्धेत सहभागी होऊ शकतात. रील पोस्ट करताना स्पर्धकांनी रील्स मध्ये @goatourism टॅग करणे अनिवार्य आहे. याबाबत अधिक माहितीसाठी https://goatourism.gov.in/ या वेेबसाईटला भेट देण्याचे आवाहन पर्यटन खात्यातर्फे करण्यात आले आहे.

Web Title: Tourism Department intention to see Goa through Reels Organizing a special Ultimate Reel Showdown tournament

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :goaगोवा