''किनारे सुरक्षेप्रकरणी पर्यटनमंत्री बाबू आजगावकर यांना बडतर्फ करा''
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2019 09:11 PM2019-10-16T21:11:07+5:302019-10-16T21:11:21+5:30
जीवरक्षकांना एस्मा लावण्याची धमकी देणा-या पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पणजी : किना-यांवर सेवा बजावणा-या जीवरक्षकांना छळ करणा-या कंत्राटदार दृष्टी लाइफ सेविंग कंपनीवर कारवाई करण्याचे सोडून जीवरक्षकांना एस्मा लावण्याची धमकी देणा-या पर्यटनमंत्री मनोहर उर्फ बाबू आजगावकर यांना मंत्रिपदावरून बडतर्फ करावे, अशी मागणी प्रदेश काँग्रेसने मुख्यमंत्र्यांकडे केली आहे.
पत्रकार परिषदेत पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्या स्वाती केरकर म्हणाल्या की, गोमंतकीय जीवरक्षकांना एस्मा लावण्याची धमकी देणे हेच ते खरे गोंयकारपण का? हेही मुख्यमंत्र्यानी स्पष्ट करावे. गेल्या दोन आठवड्यात किनाºयांवर दोन पर्यटक व एक स्थानिक अशा तीन लोकांना दुर्दैवी मृत्यु आला. या घटनांना किनारे सुरक्षा व जीवरक्षक सुविधा पुरविणारी मेसर्स दृष्टी कंपनी तसेच पर्यटन खाते पूर्णपणे जबाबदार आहे.
केरकर म्हणाल्या की, ‘सरकारकडून १४१ कोटी उकळल्यानंतरसुद्धा या कंत्राटदार कंपनीने जीवरक्षकांना पगार वेळेवर दिला नाही. वॉकी-टॉकी सारखी उपकरणे तसेच जीवरक्षकाना पिण्याचे पाणी सुद्धा देण्याचे सौजन्य न दाखवणाºया मेसर्स दृष्टी कंपनीचे कंत्राट रद्द करण्याचे सोडून आपल्या जीवाची बाजी लावणाºया जीवरक्षकाना एस्मा लावण्याची धमकी देणारे भाजप सरकार गोमंतकीयांप्रती असंवेदनशील असल्याचे उघड झाले आहे.’
‘सरकारने जीवरक्षकांना धमकावण्याचा व त्यांच्यावर दबाव आणण्याचा प्रयत्न करु नये, त्याचे गंभीर परिणाम सरकारला भोगावे लागतील. सरकारने ताबडतोब सर्व जीवरक्षकांना सरकारी सेवेत घ्यावे व माजी नौदल व लष्करीअधिकारी यांची नेमणूक करुन त्यांची देखरेख व मार्गदर्शनाखाली किनारे सुरक्षा व जीवरक्षक सेवा पुरवावी,’ असेही केरकर यांनी म्हटले आहे.
केरकर म्हणतात की, ‘पर्यटन मंत्री बाबू आजगावकर याचे 'मिशन ३० टक्के कमिशन' हे एकमेव ध्येय असून त्याना इतर कशाचेही सोयर सुतक नाही. त्यामुळेच दृष्टी कंपनीला बडतर्फ करण्याची हिंमत त्यांना नाही. त्यांनी आजपर्यंत आपल्या कुटुंबियांसह केलेल्या विदेश वारींचा खर्च तसेच त्यांच्या बरोबर विदेश दौºयावर गेलेले सरकारी नोकर असलेले त्यांचे बंधू डॉ. श्रीकांत व भावजय रश्मी यांची परदेशवारी त्यांच्या स्वखर्चाने केल्याचे हिंमत असल्यास सिद्ध करून दाखवावे.’