गोव्याचा पोर्तुगीजकालीन तुरूंग बनणार पर्यटन स्थळ
By ऑनलाइन लोकमत | Published: October 8, 2017 12:59 PM2017-10-08T12:59:19+5:302017-10-08T12:59:40+5:30
अरबी समुद्राच्या काठावर वसलेल्या गोव्यातील आग्वाद तुरुंगाचे पर्यटन स्थळामध्ये रुपांतर केले जाणार आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याचे काम सुरू केले.
पणजी : अरबी समुद्राच्या काठावर वसलेल्या गोव्यातील आग्वाद तुरुंगाचे पर्यटन स्थळामध्ये रुपांतर केले जाणार आहे. गोवा पर्यटन विकास महामंडळाने त्यासाठी कागदोपत्री सोपस्कार पार पाडण्याचे काम सुरू केले. मुख्यमंत्री पर्रीकर यांनी या कामाचा आढावा घेऊन कोणत्या तांत्रिक अडचणी येत आहेत हे नुकतेच जाणून घेतले.
सिकेरी येथे एकाबाजूने आग्वादचा किल्ला आहे आणि दुसर्याबाजूला आग्वाद तुरूंग आहे. पोर्तुगीज राजवट गोव्यात असताना सतराव्या शतकात हे बांधकाम करण्यात आले होते. पोर्तुगीज भाषेत आग्वाद म्हणजे पाणी असलेली जागा. आग्वाद किल्ल्यावर 1864 साली पोर्तुगीजांनी बांधलेला चार मजली दिपस्तंभही आहे. आशिया खंडातील सर्वात जुना दिपस्तंभ म्हणून तो ओळखला जातो.
आग्वाद किल्ल्याच्या एका टोकाच्या बाजूला टाटांचे हॉटेल आहे. दुसरीकडे असलेल्या तुरूंगात एकेकाळी गोवा मुक्ती लढ्यातील स्वातंसैनिकांना ठेवले जात होते. गोवा 1961 साली मुक्त झाला आणि मग कैदी आणि गुन्हेगारांना या तुरूंगात ठेवले जाऊ लागले. मे 2015 सालापर्यंत तुरूंगाचा वापर झाला. आता तो पूर्ण रिकामा आहे. कैद्यांना कोलवाल येथे बांधण्यात आलेल्या नव्या तुरूंगात स्थलांतरीत करण्यात आले आहे.
आता जुन्या आग्वाद किल्ल्याचे रुपांतर पर्यटन स्थळात करण्याची योजना सरकारचे पर्यटन विकास महामंडळ मार्गी लावू पाहत आहे. या कामात कोणत्या अडचणी येतात हे मुख्यमंत्र्यांनी महामंडळाचे अध्यक्ष निलेश काब्राल व अधिकाऱ्यांकडून जाणून घेतले.
किल्ल्यावर वस्तूसंग्रहालय तयार करावे. तिथे गोवा मुक्ती लढ्याचा इतिहास साकारावा आणि ध्वनी व लेजर शोद्वारे पर्यटकांची मने रिझवावी असे पर्यटन विकास महामंडळाने ठरवले आहे.