गोव्यात पर्यटक संख्या घटतेय; भाजपच्याच आमदाराकडून धोक्याचा इशारा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 17, 2019 08:53 PM2019-07-17T20:53:00+5:302019-07-17T20:55:58+5:30
पर्यटन व्यवसाय अडचणीत येईल अशा प्रकारच्या धोक्याचा इशारा तिकलो यांनी दिला.
पणजी : राज्यात खनिज खाणी अगोदरच बंद झाल्या आहेत आणि आता पर्यटकांची संख्याही दर महिन्याला पंधरा ते सोळा लाखांनी कमी होत आहे, असे सत्ताधारी भाजपचेच हळदोणोचे आमदार ग्लेन तिकलो यांनी बुधवारी विधानसभेत सांगितले. पर्यटन व्यवसाय अडचणीत येईल अशा प्रकारच्या धोक्याचा इशारा तिकलो यांनी दिला.
प्रश्नोत्तराच्या तासावेळी पर्यटन मास्टर प्लॅन व पर्यटन धोरणाच्या मसुद्याच्या विषयाबाबत आमदार अॅलिना साल्ढाणा, तिकलो, प्रतापसिंग राणो, विजय सरदेसाई आदींनी काही प्रश्न उपस्थित केले. मूळ प्रश्न श्रीमती साल्ढाणा यांचा होता. पर्यटन मास्टर प्लॅन व धोरणाच्या मसुद्याबाबत सरकारने सादरीकरण केले तेव्हा किती आमदार उपस्थित राहिले, तसेच हे धोरण तयार तरी कधी होणार अशा प्रकारचे प्रश्न आमदारांनी केले. फक्त चार आमदार उपस्थित होते. तरी आम्ही सर्वानाच विश्वासात घेऊन शक्य तेवढय़ा लवकर धोरण तयार करू, असे पर्यटन मंत्री बाबू आजगावकर यांनी उत्तरादाखल बोलताना सांगितले. श्रीमती साल्ढाणा यांनी लेखी सूचनाही केल्या असून त्या विचारात घेतल्या जातील, असे आजगावकर यांनी नमूद केले.
यावेळी आमदार तिकलो यांनी आपला मुद्दा मांडत सरकारला काही प्रश्न विचारले. चार्टर पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात कमी होत आहे. पंधरा-सोळा लाख पर्यटक दर महिन्यास कमी संख्येने येतात. मास्टर प्लॅन व पर्यटन धोरण अजून तयार होत नाही. पर्यटन व्यवसायाला याचा मोठा फटका बसेल. मास्टर प्लॅन तयार नसताना सरकारने केपीएमजी या यंत्रणोला तीन कोटी रुपये देऊन टाकले असेही तिकलो यांनी सांगितले. तीन कोटींच्या विषयाची चौकशी करावी, अशी मागणी आमदार विजय सरदेसाई यांनी केली व आजगावकर यांनी प्रसंगी चौकशी करू, अशी ग्वाही दिली. सरकारकडे पर्यटन खाते आहे, पर्यटन विकास महामंडळही आहे व तरीही आणखी पर्यटन मंडळ का स्थापन केले जाणार आहे अशी विचारणाही सरदेसाई यांनी केली.