गोव्यात टुरिस्ट टॅक्सीचा आज बंद, पर्यटक वेठीस
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2018 12:55 PM2018-01-19T12:55:31+5:302018-01-19T12:58:43+5:30
टुरिस्ट टॅक्सींच्या संपामुळे गोव्यात पर्यटकांची मोठी परवड झाली आहे. बंद मोडून काढण्यासाठी सरकारने लागू केलेला ‘एस्मा’ धुडकावून टुरिस्ट टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या आहेत.
पणजी - टुरिस्ट टॅक्सींच्या संपामुळे गोव्यात पर्यटकांची मोठी परवड झाली आहे. बंद मोडून काढण्यासाठी सरकारने लागू केलेला ‘एस्मा’ धुडकावून टुरिस्ट टॅक्सी बंद ठेवण्यात आल्या आहेत. पर्यटकांची गैरसोय होऊ नये, याकरिता कदंब महामंडळ तसेच जीटीडीसीने बसगाड्या प्रवाशांच्या सेवेसाठी सज्ज केल्या आहेत. परंतु या बसगाड्या अपु-या पडत आहेत. सुमारे 2 हजार टॅक्सीमालक येथील आझाद मैदानात जमा झाले असून आंदोलन करत आहेत. अनुचित प्रकार घडू नये यासाठी सर्वत्र कडक पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
स्पीड गव्हर्नर आणि डिजिटल मिटरला विरोध करीत राज्यातील 20 हजार टुरिस्ट टॅक्सीमालकांनी शुक्रवारी(19 जानेवारी) बंद पुकारला. सर्व प्रमुख हॉटेलांच्या आवारात तसेच रेल्वे स्थानके, दाबोळी विमानतळ तसेच बसस्थानकांच्या आवारात असलेल्या टुरिस्ट टॅक्सी बंद आहेत. फक्त काळ्या पिवळ्या टॅक्सी तसेच सरकारी खात्यांसाठी कंत्राटावर चालणा-या अवघ्याच टुरिस्ट टॅक्सी चालू आहेत. मांडवी नदीवरील दोन्ही पुलांवर पोलीस पहारा ठेवण्यात आला आहे. पुलावर ‘रास्ता रोको’ केला जाऊ नये यासाठी ही खबरदारी घेण्यात आली आहे. राजधानी शहरातच 500 हून अधिक पोलिसांचा फौजफाटा तैनात आहे.
दाबोळी विमानतळ तसेच करमळी, थिवी, मडगांव, वास्को आदी रेल्वे स्थानकांवर रेलगाड्या पोचण्याच्या वेळेत कदंबच्या बसगाड्यांची सोय करण्यात आली आहे. परंतु या बसगाड्या अपु-या पडत आहेत. काही पर्यटकांनी रिक्षा तसेच मोटारसायकलींवरुन प्रवास करणे पसंत केले. दरम्यान, आंदोलक जमलेल्या ठिकाणी आझाद मैदानावर दुपारी काँग्रेसच्या प्रदेश महिला आघाडीप्रमुख प्रतिमा कुतिन्हो तसेच राजन घाटे यांनी भेट देऊन आंदोलनाला पाठिंबा दिला.
टुरिस्ट टॅक्सींचा संप चिरडण्यासाठी सरकार जर ‘ओला’ किंवा ‘उबेर’ची सेवा गोव्यात सुरु करण्याचा विचार करीत असेल तर आम्ही चाळीसही आमदारांविरुध्द काम करु आणि त्यांच्याविरुध्द आघाडी उघडू, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे. स्पीड गव्हर्नर केवळ टुरिस्ट टॅक्सींनाच का, इतर वाहनांना का नाही, असा सवाल त्यांनी केला आहे. पर्यटकांना वेठीस धरण्याच्या या प्रकाराची गंभीर दखल घेत भविष्यात ‘उबर’, ‘ओला’सारख्या टॅक्सी सेवा सुरु कराव्या लागतील, असा इशारा पर्यटन विकास महामंडळाचे अध्यक्ष आमदार नीलेश काब्राल यांनी गुरुवारी सरकारच्यावतीने दिला होता.
सरकारसाठी कंत्राटावर चालणा-या बंद टॅक्सींची मुख्यमंत्र्यांनी मागितली माहिती
या संपामुळे पर्यटकांबरोबरच स्थानिकांचीही बरीच गैरसोय झाली असून टॅक्सीमालकांकडून लोकांना वेठीस धरण्याच्या प्रकारामुळे तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. दक्षिण गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात 0८३२-२७९४१00 या क्रमांकावर तर उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात 0८३२-२२२५२८३ या क्रमांकावर संपर्क साधून पर्यटकांनी त्यांची अडचण सांगितल्यास पर्यटन खात्याचे अधिकारी आवश्यक ते साहाय्य करतील. याशिवाय जीटीडीसीच्या रेसिडेन्सींमध्ये माहिती केंद्रे उघडण्यात आलेली आहेत. दरम्यान, वेगवेगळ्या सरकारी खात्यांसाठी कंत्राटावर चालणाºया ज्या टॅक्सी आज बंद ठेवण्यात आल्या त्याची माहिती मुख्यमंत्री कार्यालयाने मागविली आहे. बंद राहिलेल्या टॅक्सींवर कडक कारवाई करण्यात येणार आहे.
सेवेसाठी कदंबच्या बसगाड्या
दरम्यान, कदंब महामंडळाचे वाहतूक सरव्यवस्थापक संजय घाटे यांच्याशी संपर्क साधला असता दुपारी 12 वाजेपर्यंत दाबोळी विमानतळ ते पणजी व परत अशा बसगाड्यांच्या 5 फे-या झाल्याचे तर कळंगुट ते मडगांव रेल्वेस्थानक बसची एक फेरी आणि कळंगुट ते दाबोळी विमानतळ बसच्या 2 फे-या झाल्या आणि एकूण ३१९ पर्यटकांची सोय केल्याचे त्यांनी सांगितले.
टॅक्सी बंद ठेऊन पणजीत आझाद मैदानावर एकत्र जमलेले चालक.
गोव्यात दुचाकीवरून प्रवास करण्याच्या सुविधेचा पर्यटक नेहमीच आधार घेतात. अशा पिवळ्या दुचाकी चालकांना पायलट म्हटले जाते. पायलट सेवेला शुक्रवारी अच्छे दिन आले होते.