गोव्यातील समुद्रात पर्यटक बुडून मरण्याचे सत्र नव्याने सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 4, 2017 08:29 PM2017-09-04T20:29:55+5:302017-09-04T20:30:27+5:30
- सदगुरू पाटील
पणजी, दि. 4 - गोव्यातील उधाणलेल्या आणि उफाळलेल्या समुद्रात पर्यटक बुडून मृत्यू पावण्याचे सत्र नव्याने सुरू झाले आहे. यामुळे गोव्याच्या पर्यटन उद्योगाशी निगडीत विविध घटकांसाठी हा चिंतेचा विषय बनला आहे.
पूर्वी गोव्यात वार्षिक सरासरी अडिचशे मृत्यू हे समुद्रात बूडून होत होते. नंतरच्या काळात सरकारने किनार्यांवर सुरक्षा व्यवस्था वाढवली. दृष्टी नावाच्या यंत्रणेकडून गोव्यातील 105 किलोमीटर लांबीच्या किनार्यांवर चारशे जीवरक्षक ठेवण्यात आले. परिणामी पर्यटक बुडून मरण्याचे प्रमाण घटले होते. मात्र आता पावसाळ्यात समुद्रात पोहायला कुणीच जाऊ नये असे अपेक्षित असतानाही पर्यटक धोका पत्करतात व जीव गमावतात. गेल्या तीन दिवसांत गोव्यातील समुद्रांत बुडून चौघांचा मृत्यू झाला आहे. यात दोघे पर्यटक आणि दोघे गोमंतकीय मच्छीमार आहेत.
सोमवारी 4 रोजी नैनितालमधील 22 वर्षीय पर्यटक गोव्यातील जगप्रसिद्ध कळंगुट समुद्रात बुडाला. रविवारी 3 रोजी हिमाचल प्रदेशातील आशत्रय दत्ता हा 27 वर्षीय पर्यटक कांदोळी समुद्रात बुडाला. हिमाचल प्रदेशमधून पर्यटकांचा एक गटच गोव्यात आला होता.
तत्पूर्वी दोनापावल येथील समुद्रात गोव्यातील दोघे मच्छीमार बुडाले. अनेकदा किनार्यांवर जीवरक्षक पर्यटकांना समुद्रात उतरू नका अशी सूचना करतात पण पर्यटक त्याकडे दुर्लक्ष करतात. काहीवेळा मद्यपान करूनही पर्यटक समुद्रस्नान करायला जातात व वाहून जातात. येत्या महिन्यापासून गोव्याचा नवा पर्यटन मोसम सुरू होत आहे व अशावेळीच पर्यटक बुडून मरण्याचे सत्र सुरू झाल्याने संबंधित यंत्रणांनाही चिंता वाटू लागली आहे.