गोव्यात नववर्षासाठी पर्यटकांची धूम; ५० जणांना पकडले, ९ मद्यपी चालक निघाले!
By पंकज शेट्ये | Published: December 23, 2023 06:21 PM2023-12-23T18:21:42+5:302023-12-23T18:22:06+5:30
वाहतूक पोलिसांनी रात्री राबवली धडक मोहिम
पंकज शेट्ये, लोकमत न्यूज नेटवर्क, वास्को: गेल्या तीन दिवसापासून दक्षिण गोव्यातील वास्को वाहतूक पोलीसांनी उशिरा रात्री धडक मोहीम राबवून वाहतूक कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडायला सुरवात केली आहे. तीन दिवसात वास्को वाहतूक पोलीसांनी ५० वाहन चालकांना वाहतूक कायद्याचे उल्लंघन करताना पकडले असून त्यातील ९ वाहन चालक दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे उघड झाले.
नवीन वर्ष साजरे करण्यासाठी गोव्यात येणाऱ्या पर्यटकांची संख्या वाढायला सुरवात झाली आहे. गोव्यात हल्ली अपघाताचे प्रमाण वाढलेले असून अपघात होऊनये यासाठी वाहतूक पोलीस आणि इतर सरकारी यंत्रणे विविध पावले उचलत आहेत. गोव्यात पर्यटक हंगामा जोरात चालू असून नवीन वर्ष जसे जवळ येत आहे तसे अनेक ठीकाणी पार्टी इत्यादी कार्यक्रम व्हायला लागले आहे. नवीन वर्ष जवळ येत असल्याने विविध ठिकाणी होणाऱ्या पर्टी कार्यक्रमात उपस्थित असलेले अनेक नागरिक - पर्यटक दारूच्या नशेत वाहने चालवतात. तसेच अनेक वाहन चालक वाहतूक कायद्याचे उल्लंघन करतात. त्यामुळे अपघात होण्याचा धोका नाकारता येत नाही.
नाताळ - नवीन वर्षाच्या काळात अपघात होऊनये यासाठी वास्को वाहतूक पोलीसांनी धडक मोहीम राबवून दारूच्या नशेत वाहने चालवणाऱ्यांना आणि इतर वाहतूक कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडून कारवाई करण्यास सुरवात केली आहे. बुधवारी रात्री ११ ते १ वाजेपर्यंत वास्को वाहतूक पोलीसांनी वेर्णा महामार्गावरील बिर्ला क्रोस जंक्शनजवळ थांबून २४ जणांना वाहतूक कायद्याचे उल्लंघन करताना पकडले. त्यातील ६ जण दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे उघड झाले. गुरूवारी रात्री ११ ते १ पर्यंत बिर्ला क्रोस जंक्शनजवळ वाहतूक पोलीसांनी थांबून वाहतूक कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या २१ जणांना पकडले. त्यातील दोघेजण दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे उघड झाले. शुक्रवारी रात्री ९ ते ११ अशा वेळेत वाहतूक पोलीसांनी दाबोळी - बोगमाळो जंक्शनजवळ थांबून ५ जणांना वाहतूक कायद्याचे उल्लंघन करताना पकडले. त्यातील एकटा दारूच्या नशेत वाहन चालवत असल्याचे उघड झाले.
तीन दिवसातील कारवाईत दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्या चालकांना पकडल्यानंतर पोलीसांनी त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना आणि वाहन जप्त केले. दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांना न्यायालयातून दंड देण्यात येणार असून त्यांचा वाहन चालवण्याचा परवाना न्यायालयात पाठवणार असल्याची माहीती वास्को वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेवर यांनी दिली. तीन दिवसात इतर वाहतूक कायद्याचे उल्लंघन केलेल्या ४१ चालकांकडून एकूण २७ हजार ५०० रुपयांचा दंड वास्को वाहतूक पोलीसांनी वसूल केल्याची माहीती वाहतूक पोलीस निरीक्षक शैलेश नार्वेकर यांनी दिली. दारूच्या नशेत वाहन चालवणाऱ्यांना आणि इतर वाहतूक कायद्यांचे उल्लंघन करणाऱ्यांना पकडण्याची ही धडक मोहीम पुढचे काही दिवस चालूच राहणार असल्याची माहीती प्राप्त झाली.