उन्हाळी पर्यटनासाठी पर्यटक गोव्याकडे
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2024 04:48 PM2024-05-12T16:48:45+5:302024-05-12T16:51:05+5:30
बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्च, सेंट कॅथड्रल चर्च परिसरात पर्यटकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यात प्रामुख्याने महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, केरळ येथील पर्यटकांचा समावेश होता.
पणजी: उन्हाळी पर्यटनासाठी गोव्याकडे पर्यटकांची पावले वळू लागली असून रविवारी जुने गोवे येथे देशी विदेशी पर्यटक मोठया संख्येने दिसून आले. यावेळी पर्यटकांनी बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्च बाहेर रांग लावल्याचे पाहण्यास मिळाले.
बासिलिका ऑफ बॉम जिजस चर्च, सेंट कॅथड्रल चर्च परिसरात पर्यटकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. यात प्रामुख्याने महाराष्ट्र, दिल्ली, गुजरात, केरळ येथील पर्यटकांचा समावेश होता. अनेक पर्यटक हे आपली वाहने तसेच रेंट अ कार घेऊन आल्याने वाहतूक कोंडी होऊ नये यासाठी वाहतूक पोलिस तेथे तैनात केले होते.
गोव्यात सध्या कमाल तापमान ३५ डिग्री अंश इतका आहे. त्यामुळे प्रचंड उकाडा आहे.मात्र असे असूनही उन्हाळी पर्यटनासाठी पर्यटक येत आहेत. जुने गोव्यात पर्यटकांची नेहमीच गर्दी असते. यावर्षी डिसेंबर मध्ये सेंट फ्रान्सिस झेव्हियर यांचे शवप्रदर्शन होणार आहे. दर दहा वर्षांनी ते होते. त्यामुळे या निमित देशी विदेशी पर्यटक मोठया संख्येने येण्याची शक्यता आहे.