पेटीएमची एक लिंक, दोन क्लिक अन् खात्यातून १ लाख १० हजार गायब
By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2019 05:49 PM2019-09-19T17:49:43+5:302019-09-19T17:52:50+5:30
पोलिसांकडून दोन आरोपींचा शोध सुरू
मडगाव: पेटीएमच्या माध्यमातून आगाऊ रक्कम अदा करण्याचे आमिष दाखवून व्यापाऱ्याला लाखाचा गंडा घातला गेल्याची घटना गोव्यात घडली. हेमंत व राकेश शर्मा अशी संशयितांची नावं आहेत. त्यांच्याविरोधात निखिल अशोक मजिथिया यांनी तक्रार दिली आहे. या प्रकरणी संशयितांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.
संशयितांनी तक्रारदार निखिल मजिथिया यांना सिमेंट विकत घ्यायचं असल्याचं सांगितलं. यानंतर हेमंतनं मोबाईलवरुन मजिथिया यांच्याशी संपर्क साधला आणि आपण पाठवत असलेली पेटीएम लिंक उघडण्यास सांगितलं. मजिथिया यांनी लिंकवर क्लिक केलं असता, त्यांच्या खात्यातून ६३ हजार रुपये वजा झाले.
यानंतर मजिथिया यांना राकेशचा फोन आला. मी हेमंतचा मित्र असून, तुम्ही तुमच्या मोबाईलवरुन लिंक उघडा. तुम्ही लिंक उघडल्यावर हेमंतनं काढलेले पैसे पुन्हा तुमच्या खात्यात येतील, असं राकेशनं मजिथिया यांना सांगितलं. यानंतर मजिथिया यांनी लिंकवर क्लिक केलं असता, त्यांच्या खात्यातून ४८ हजार रुपये वजा झाले. आपली फसवणूक झाल्याचं लक्षात येताच मजिथिया यांनी मडगाव पोलीस ठाण्यात धाव घेतली.
याप्रकरणी पोलिसांनी भारतीय दंड विधानच्या ४२० कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. मडगाव पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक तुषार लोटलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक हरिश गावस या प्रकरणाचा तपास करत आहेत.