भाडेवाढिला म्हापशातील व्यापाऱ्यांचा विरोध; शहर बंद करण्याचा इशारा
By काशिराम म्हांबरे | Published: January 4, 2024 02:29 PM2024-01-04T14:29:05+5:302024-01-04T14:30:54+5:30
शहर बंद करण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आला आहे.
काशिराम म्हांबरे, म्हापसा: म्हापसा नगरपालिकेच्या प्रस्तावीत भाडे वाढिला व्यापारी संघटनेकडून विरोध करण्यात आला आहे. आठवडाभरात निर्णय मागे न घेतल्यास म्हापसा शहर बंद करण्याचा निर्णय संघटनेकडून घेण्यात आला आहे.
येथील नगरपालिकेने आठवडाभरापूर्वी आपल्या सर्वसाधारण बैठकीत बाजार पेठेतील गाडे, दुकाने तसेच इतर आस्थापनात भाडेवाढ लागू करण्याचा निर्णय घेतला होता. त्याला विरोध करण्यासाठी म्हापसा व्यापारी संघटनेच्या शिष्टमंडळाने पालिकेच्या नगराध्यक्षा प्रिया मिशाळ यांची त्यांच्या कार्यालयात जाऊन भेट घेतली. या भेटी दरम्यान भाडेवाढिला विरोध करणारे निवेदन अध्यक्ष श्रीपाद सावंत यांनी सादर केले.
यावेळी नगराध्यक्षा मिशाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार सार्वजनिक बांधकाम खात्याने अधिसुचीत केलेल्या नव्या वाढिनुसार ही भाडेवाढ करण्यात आली असल्याचे सांगितले. पूर्वी प्रती चौरस मिटर दर १५६ रुपयेदर होता. नव्या दुरुस्तीनुसार २९६ रुपये प्रती चौरस मिटर करण्यात आली आहे. त्यानुसार भाडेवाढिचा हा ठराव मंजूर करण्यात आला असल्याचे त्या म्हणाल्या. नवी वाढ व्यापाºयांना मान्य नसल्याने ती मागे घ्यावी अशी त्यांनी विनंती केली आहे. सदर प्रस्तावाला बैठकीत मंजूरी देण्यात आलेली आहे. त्यामुळे व्यापारी संघटनेने सादर केलेल्या निवेदनावर बैठकीत योग्य निर्णय होणे शक्य असल्याचे मिशाळ म्हणाल्या.
या बाजाराची उभारणी पोर्तुगीजांनी केली होती. त्यात नगरपालिका मंडळाकडून कसल्याच प्रकारच्या सुविधा उपलब्ध करुन दिल्या नाहीत. फक्त भाडेवाढ केली जातेअसेआरोप संघटनेचे खजीनदार जितेंद्र फळारी यांनी केले.
मंडळाकडून फक्त भाडेवाढच नाही तर घरपट्टी सुद्धा तीन पटीने वाढवण्यात आली आहे. लोकांनी आता जागृत होण्याची वेळ आली असून आठवड्याभरात निर्णय रद्द न केल्यास बाजारासोबत म्हापसा शहर बंद करण्याचा इशारा अध्यक्ष श्रीपाद नाईक यांनी दिला.