म्हापशातील भाडेवाढीविरोधात व्यापाऱ्यांचे आंदोलन
By काशिराम म्हांबरे | Published: January 18, 2024 04:29 PM2024-01-18T16:29:37+5:302024-01-18T16:30:02+5:30
- तोडगा काढण्याचे आमदाराचे आश्वासन .
काशिराम म्हांबरे, म्हापसा: येथील नगरपालिका मंडळाने बाजारपेठेतील दुकानांची केलेल्या भाडेवाढीवर नाराज झालेल्या म्हापसा व्यापारी संघटनेकडून निशेध व्यक्त करीत पालिकेवर धडक मोर्चा काढला. तसेच पालिकेत ठिय्या आंदोलन केले. केलेल्या आंदोलनाची दाखल घेऊन स्थानिक आमदार उपसभापती जोशुआ डिसोझा यांनी आज संध्याकाळी पालिका मंडळाची बैठक घेऊन भाडेवाढिवर तोडगा काढण्याचेआश्वासन त्यांना दिले. दिलेल्या आश्वासनानंतर व्यापाऱ्यांकडून आंदोलन तात्पुर्ते मागे घेण्यात आले.
२९ डिसेंबर रोजी मंडळाच्या झालेल्या सर्वसाधारण बैठकित साबांखाच्या दरानुसार भाडेवाढ करण्याचा निर्णय घेण्यात आलेला. यानुसार सरासरी १०० टक्के अर्थात १५२ चौरस मिटर वरून २९६ चौरस मिटर भाडे वाढ करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला होता. वाढिचा विरोध करुन आरंभी संघटनेकडून नगराध्यक्षांना निवेदन सादर केले होते. त्यानंतर आमदारांची भेट घेऊन त्यांनाही निवेदन सादर करण्यात आलेले पण त्यांच्याकडून देण्यात आलेल्या आश्वासनांची पुर्तता होत नसल्यानेसंतप्त व्यापाऱ्यांनी आज गुरुवारी पालिकेवर धडक मोर्चा काढला होता. सुमारे ३०० हून अधिक व्यापारी त्यात सहभागी झाले होते.
आज सकाळी व्यापारी संघटनेचे पदाधिकारी श्रीपाद सावंत यांच्या अध्यक्षतेखाली बाजारात एकत्रीत येवून त्यांनी प्रथम बाजारपेठ बंद ठेवली नंतर सर्वांनी पालिकेवर धडक मोर्चा काढला. यावेळी व्यापाऱ्यांनी पालिकेत आंदोलन करून जोरदार घोषणाबाजी केली. तसेच नगराध्यक्ष आणि आमदारांच्या भेटीची मागणी केली. मागणी मान्य न झाल्यास उद्या शुक्रवारी बाजारपेठ बंद ठेवण्याचा इशारा संघटनेकडून देण्यात आला होता.
आंदोलनाची माहिती उपलब्ध होताच आमदार जोशुआ डिसोझा तसेच नगराध्यक्षा प्रिया मिशाळ काही तासानंतर पालिकेत दाखल झाले. आमदारांनी नगराध्यक्ष तसेच इतर नगरसेवकांच्या उपस्थितीत व्यापारी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन यावर चर्चा केली. चर्चेनंतर या विषयावर आज सायंकाळी पालिका मंडळासोबत पुन्हा चर्चाकरुन तोडगा काढण्याचे आश्वासन आमदारांनी व्यापाºयांना दिले. दिलेल्या आश्वासनानंतर व्यापाऱ्यांनी आंदोलन तात्पुर्ते मागे घेतले पण योग्य तोडगा न निघाल्यास आंदोलन उग्र करण्याचा इशारा व्यापाऱ्यांनी दिला.