फोंडा पालिकेमध्ये व्यापाऱ्यांचा ठिय्या

By Admin | Published: March 5, 2015 01:30 AM2015-03-05T01:30:58+5:302015-03-05T01:32:31+5:30

फोंडा : फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांनी आठ दिवसांच्या मुदतीत बाजारातील फुटपाथ मोकळा न केल्याच्या

Tradesmen in Fonda Municipal | फोंडा पालिकेमध्ये व्यापाऱ्यांचा ठिय्या

फोंडा पालिकेमध्ये व्यापाऱ्यांचा ठिय्या

googlenewsNext

फोंडा : फोंडा पालिकेचे मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांनी आठ दिवसांच्या मुदतीत बाजारातील फुटपाथ मोकळा न केल्याच्या निषेधार्थ बुधवारी बाजारातील व्यापाऱ्यांनी पालिका इमारतीत ठिय्या मांडला. सकाळी साडेदहा वाजल्यापासून संध्याकाळी साडेपाच वाजेपर्यंत व्यापाऱ्यांनी पालिकेत ठाण मांडून पालिका कर्मचाऱ्यांना
कोणतेही काम करण्यास मोकळीक दिली नाही.
याबाबत व्यापारी संघटनेचे अध्यक्ष किशोर मामलेकर म्हणाले की, काही दिवसांपूर्वी बाजारातील व्यापाऱ्यांच्या शिष्टमंडळाने पालिका मुख्याधिकारी जॉन्सन फर्नांडिस यांची भेट घेऊन बाजारातील फुटपाथ मोकळे करण्याची मागणी केली होती. या वेळी पालिका मुख्याधिकाऱ्यांनी ८ दिवस म्हणजे मंगळवारपर्यंत मुदत मागून घेतली होती. मात्र, बुधवार उजाडला तरी कोणतीही कारवाई न झाल्याने बाजारातील व्यापारी मुख्याधिकाऱ्यांना भेटण्यास आले होते. मुख्याधिकारी रजेवर असल्याने व्यापाऱ्यांनी पालिकेतच ठाण मांडून निषेध व्यक्त केला.
पालिकेबाहेर मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त ठेवला होता. व्यापाऱ्यांनी घोषणाबाजी केली. दुपारी नगरसेवक व्यंकटेश नाईक हे पालिकेत आले असता व्यापाऱ्यांनी त्यांना पालिकेत कोंडून ठेवल्याची अफवा उठली. मात्र, संध्याकाळी व्यंकटेश नाईक यांच्याशी संपर्क साधला असता तसा कोणताही
प्रकार घडला नसल्याचे त्यांनी सांगितले. आपण पालिकेत बसून शिमगोत्सवासंदर्भातील काम पूर्ण केल्याचे त्यांनी सांगितले.
संध्याकाळी उपनगराध्यक्ष शांताराम कोलवेकर, नगरसेवक सुनील देसाई हे पालिकेजवळ आले. मात्र, व्यापाऱ्यांचा जमाव पाहून पालिकेत गेले नाही. ते परस्पर माघारी जाताना पाहून व्यापाऱ्यांनी त्यांची हुर्यो उडवली. व्यापाऱ्यांच्या ठिय्या आंदोलनाला आपच्या स्वाती केरकर तसेच कामगार नेते अजितसिंह राणे यांनी उपस्थित राहून पाठिंबा व्यक्त केला. संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास व्यापाऱ्यांनी माघारी फिरण्याचा निर्णय घेतला. मात्र, गुरुवारी सकाळी ९.३0 वाजता पुन्हा पालिकेत येण्याचा निर्णयही बुधवारी घेण्यात आला. (प्रतिनिधी)

Web Title: Tradesmen in Fonda Municipal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.