गोवा - आजही गावातून राखली जाते नाताळाची पारंपारिकता
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2017 06:18 PM2017-12-26T18:18:27+5:302017-12-26T18:20:57+5:30
वाढत्या जागतिकरणाच्या तसेच बदलत्या काळात शहरात नाताळ सणातील पारंपारिकतेपासून दूर गेले असले गावातील गावपण राखून ठेवलेल्या लोकांनी आजही सणाची पारंपारिकता जपून ठेवली आहे
म्हापसा - वाढत्या जागतिकरणाच्या तसेच बदलत्या काळात शहरात नाताळ सणातील पारंपारिकतेपासून दूर गेले असले गावातील गावपण राखून ठेवलेल्या लोकांनी आजही सणाची पारंपारिकता जपून ठेवली आहे. गावात लोकांचे एकमेकांशी असलेल्या सलोख्याचे नाते, हीतसंबंध ऋणानुबंध यांच्या जोरावर आजही ही पारंपारिकता कायम राहिली आहे.
जग अत्याधुनिकतेकडे मार्गक्रमण करीत असून बदलत्या या युगात शहरातील नाताळ सणावर त्याचे परिणाम होत चालले आहेत. नाताळ सणाच्या पूर्वसंध्येला चर्चमध्ये रात्रीच्या वेळी होणारी प्रार्थनासभा वगळता लोक सहसा घरातून बाहेर जाणे टाळत असतात. आपल्या घरापूरता कुटुंबासहीत नाताळ सणाचा आनंद घेण्यावर समाधान मानले जाते. एखाद्यावेळी सणाच्या शुभेच्छा घ्यायच्या झाल्या तर त्या फोनवरुन किंवा मेसेज पाठवून दिले जातात. शहरातील चर्चमध्ये सुद्धा आयोजित होणा-या विविध कार्यक्रमाला या कारणास्तव जेमेतेम लोक उपस्थित असतात. मनात आले तर किनारी भागातील संगीत रजनीत सहभागी होत असतात.
शहराच्या उलट आजही गावात वातावरण आहे. सणातील पारंपारिकता जपली जात आहे. गावात नाताळ सण सुरु होण्याच्या आदल्या दिवशी पासून गावातून कॅरल गीते गावून फेरी काढण्याची परंपरा जपली जाते. त्यातील सहभागी लोक सुद्धा नाताळ सणाच्या पारंपारिक दिवसातील वेषभूषा करुन त्यात सहभागी होत असतात. नाताळच्या आदल्या दिवशी रात्रीच्या प्रार्थने पासून चर्चीच्या आवारात सुरु होणारे विविध मनोरंजनात्मक कार्यक्रम नवीन वर्षेच्या दिवसापर्यंत साजरे केले जातात. यात छोटी नाटकुली, गितांचे सादरीकरण, सणावर आधारीत कार्यक्रमाचा समावेश असतो. त्याची विभागणी गावातील वाड्याच्या स्तरावर केली जाते. वाड्यातील लोक नंतर मनोरंजनात्मक कार्यक्रम सादर करतात. याच्या बदला शहरातील लोक आयोजित होणाºया विविध संगीत रजनीच्या कार्यक्रमात सहभागी होऊन हा सण साजरा करण्यावर भर देतात.
नाताळाच्या दिवसात तर गावातील परिसर विद्युत रोषणाई उजळून जात असतो. प्रत्येकाच्या घरात अंगणात आकर्षक अशी रोषणाई केली जाते. मागील काही वर्षापासून तर या रोषणाईला टाकावू वस्तू पासून विभिन्न वस्तू तयार करुन त्याला त्याची जोड दिली जात आहे. त्यातील बहुतांश वस्तू निसर्गातील विभीन्न वस्तूंचा वापर करुन बनवल्या जातात. परसातील झाडांवर या वस्तू लटकावून सुंदरतेत भर दिली जाते.
गावात गोठ्याच्या तसेच नक्षत्रे व ख्रिसमस ट्री बनवण्याच्या स्पर्धा भरवल्या जातात. त्यासाठी आकर्षक बक्षीसे दिले जातात. बक्षीस वितरणासाठीचा मोठा कार्यक्रमही केला जातो. त्यातून लोकही एकत्रीत येत असतात. त्यामुळे किमान आठवडाभर एकमेकांच्या घरी जाऊन लोकांना शुभेच्छा देण्यावर त्यांच्या आनंदात सहभागी होण्यावर भर दिला जातो.
गावात तर सणाची पूर्व तयारी किमान आठ दिवस सुरु होत असते. सणाला लागणारे विविध पदार्थ बनवण्यासाठी ऐकमकांच्या घरी जाऊन मदतीचा हात देण्याची प्रथा रुढ झालेली आहे. संबंधीत वर्षात एखाद्या व्यक्तीच्या घरी दुर्घटना घडली असल्यास सणाचे पदार्थ बनवले जात नाहीत. अशावेळी तयार केलेले पदार्थ त्यांच्या घरी जाऊन त्यांना देण्याची प्रथा आजही पाळले जातात. काही लोक गरीबांच्या घरी किंवा वृद्धाश्रमात जाऊन दानधर्मावर भेट देत असतात.
गावातील सणाचे प्रमुख केंद्र स्थान तेथील चर्च मानले जाते. घरातील तयारी सोबत वेळात वेळ काढून चर्चीतली तयारी सुद्धा केली जाते. चर्चीतील कार्यक्रम हा मोठा असल्याने तेथील गोठा इतर विविध आकर्षणे चांगल्या प्रकारे सामुहिकरित्या बनवली जातात. गोठ्यांना सुद्धा पारंपारिकतेची झालर दिली जाते. पारंपारिक साहित्याचा वापर गोठ्यांसाठी केला जातो. लोकांना एकत्रीत आणून त्यांच्यातील हितसंबंध आणखीन दृढ करणे हा गावातील सणा मागचा प्रमुख उद्देश असतो.
चर्चीत होणाºया विविध कार्यक्रमा बरोबर गावातील लोकांसाठी सांगितीक कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. गोव्यातील खास करुन गावातील अनेक लोक देश विदेशात स्थायीक झाले आहेत. सणा निमीत्त हे लोक आपल्या गावी येत असतात किमान पंधरा दिवसाची सुट्टी घेऊन आजही इथल्या गावात येत असतात. गावातील लोकां समवेत ते सुद्धा सहभागी होऊन नाताळ सणाचा आनंद लुटत असतात.