'चिंबल जंक्शन' वरील वाहतूक प्रश्न सुटणार; CM प्रमोद सावंत यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 13, 2024 12:40 PM2024-11-13T12:40:01+5:302024-11-13T12:47:15+5:30

दुसरी बाजू सहा महिन्यांत होईल पूर्ण

traffic problem at chimbal junction will be solved flyover inaugurated by cm pramod sawant | 'चिंबल जंक्शन' वरील वाहतूक प्रश्न सुटणार; CM प्रमोद सावंत यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण

'चिंबल जंक्शन' वरील वाहतूक प्रश्न सुटणार; CM प्रमोद सावंत यांच्या हस्ते उड्डाणपुलाचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: 'चिंबल जंक्शन'वरील वाहतूककोंडी अखेर सुटणार आहे. चिंबल येथील बहुप्रतिक्षित उड्डाणपुलाच्या एका मार्गाचे मंगळवारी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्या हस्ते लोकार्पण झाले. त्यांच्यासोबत सांताक्रूझचे आमदार रुदोल्फ फर्नांडिस, महापौर रोहित मोन्सेरात, जिल्हा पंचायत सदस्य गिरीश उसकईकर, उपमहापौर संजित रॉड्रिग्ज, चिंबलचे सरपंच संदेश चोडणकर, बांधकाम खात्याचे अभियंता ज्यूड काव्र्व्हलो व इतर मान्यवर उपस्थित होते.

चिंबल जंक्शनवरील उड्डाणपूल हा सरकारने आतापर्यंत केलेल्या विकासकामाचाच एक भाग आहे. हा उड्डाणपूल खुला होताच पणजी ते डिचोली, सत्तरी, फोंडा येथे ये-जा करणाऱ्यांना फायदा होणार आहे. सध्या उड्डाणपुलाच्या एका मार्गाचे काम सुमारे ४२ कोटी रुपये खर्चुन पूर्ण झाले आहे, तर दुसऱ्या मार्गाचे काम येणाऱ्या सहा महिन्यांत पूर्ण करू, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिले. सांताक्रूझ मतदारसंघाचा बऱ्यापैकी विकास होत आहे. येथे अनेक मोठे प्रकल्प येत आहेत; पण येथे सर्वाधिक कचऱ्याची समस्या जाणवते. कचरा समस्या सोडविण्यावर आमदार, पंचायतीने भर द्यावा. गरज असल्यास आमदारांनी सर्व पंचायतींची एकत्रित बैठक घ्यावी आणि तोडगा काढावा, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली.

या जंक्शनवर आतापर्यंत २० पेक्षा जास्त लोकांचा अपघाती मृत्यू झाला आहे. या उड्डाणपुलामुळे वाहतूककोंडी सुटणार असून अपघातही कमी होतील, अधिवेशनात वारंवार या उड्डाणपुलाबाबतचा विषय मी मांडला. अनेकदा मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. अखेर मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार हे काम झाले, असे आमदार फर्नाडिस म्हणाले.

मडगाव बायपासचे काम डिसेंबरपर्यंत 

पर्वरी उड्डाणपूल आणि मडगाव बायपास रस्ता असे महत्त्वाचे प्रकल्प लवकरच पूर्ण होणार आहेत. मडगाव बायपास रस्त्याचे बांधकाम डिसेंबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल, तर पर्वरीच्या उड्डाणपुलाचे कामासाठी अजून दीड ते दोन वर्षे लागू शकतात. सध्या या कामांमुळे लोकांना त्रास होत आहे. याची मला जाणीव आहे: परंतु विकास हवा असल्यास थोडा त्रास सहन करावा लागेल, असे मुख्यमंत्री सावंत म्हणाले.

मामीचे नाव देण्याचे आश्वासन 

चिंबल जंक्शनवर उड्डाणपूल उभारणे हे माजी मंत्री व्हिक्टोरिया फर्नाडिस म्हणजेच मामी यांचे स्वप्न होते. मामींनी या उड्डाणपुलासाठी खूप धडपडही केली; परंतु त्यात त्यांना यश आले नाही. आता हा उड्डाणपूल होत आहे, तेव्हा या उड्डाणपुलाला मार्मीचे नाव मिळावे. चिंबल पंचायतीने तसा ठराव देखील मंजूर केला आहे, अशी माहिती आमदार फर्नाडिस यांनी दिली. याबाबत मुख्यमंत्री सावंत यांच्याशी चर्चा केली असून काम पूर्ण होताच या उड्डाणपुलाला मामींचे नाव देऊ, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिल्याचे फर्नाडिस यांनी सांगितले.

पहिला मान मिळाला रुग्णवाहिकेला 

मुख्यमंत्र्यांनी फीत कापून उड्डाणपुलाचे लोकार्पण केल्यांनतर काही वेळातच जुने गोवे मार्गाहून पणजीच्या दिशेने दोन रुग्णवाहिका जात होत्या. चिबल सव्र्हिस रोडवर कोंडी झाल्याने रुग्णवाहिकांनी मार्ग बदलून नुकत्याच लोकार्पण झालेल्या उड्डाणपुलाचा मार्ग निवडला. लोकार्पणानंतर वाहतूक सुरू होण्यापूर्वीच एकूण तीन रुग्णवाहिका या उड्डाणपुलावरून गेल्या.

मतदारसंघातील कचऱ्याची समस्या सोडवू 

सांताक्रूझमध्ये कचऱ्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्यात येत नसल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले असून, त्यात तथ्य आहे. त्यासाठी सर्व पंचायतींनी एकत्रित काम करण्याची आवश्यकता आहे. घरोघरी जाऊन कचरा उचलण्यावर पंचायतीनी भर द्यावा. आमच्या मतदारसंघात एमआरएफ शेड आहे; पण ती रस्त्याच्या बाजूला आणि लहान आहे. त्यामुळे सर्वांत आधी ही एमआरएफ रोड इतर ठिकाणी स्थलांतरित करण्याची आवश्यकता आहे. याबाबत सर्व पंचायतींशी चर्चा करण्यात येईल. लवकरच ही समस्या देखील सुटेल, असा विश्वास आमदार फर्नाडिस यांनी व्यक्त केला.
 

Web Title: traffic problem at chimbal junction will be solved flyover inaugurated by cm pramod sawant

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.