विद्यार्थ्यांसाठी वाहतूक नियमविषयक अभ्यासक्रम : निखिल देसाई
By ऑनलाइन लोकमत | Published: December 15, 2018 01:58 PM2018-12-15T13:58:22+5:302018-12-15T13:58:30+5:30
राज्यातील विद्यार्थ्यांना वाहतूकविषयक नियम कळावेत, त्यांच्यात त्याविषयी शिस्त यावी या हेतूने वाहतूक खात्याने शिक्षण खात्याकडून अभ्यासक्रम तयार करून घेतला आहे.
पणजी : राज्यातील विद्यार्थ्यांना वाहतूकविषयक नियम कळावेत, त्यांच्यात त्याविषयी शिस्त यावी या हेतूने वाहतूक खात्याने शिक्षण खात्याकडून अभ्यासक्रम तयार करून घेतला आहे. यापुढे हा अभ्यासक्रम लागू होईल, असे सरकारच्या वाहतूक खात्याचे संचालक निखिल देसाई यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.
विद्यार्थ्यांची वाहतूक करण्यासाठी जी वाहने वापरली जातात, त्या वाहनांमध्ये सुरक्षात्मक उपाय असायला हवेत. रिक्षा व अन्य तत्सम छोट्या वाहनांमध्ये मोठ्या संख्येने विद्यार्थी कोंबले जातात. अशा वाहनांविरुद्ध कारवाई केली जाईल. कारण विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने हे धोक्याचे आहे. लवकरच पालक शिक्षक संघ आणि विद्यालयांची व्यवस्थापने यांची एकत्रित बैठक बोलवली जाईल, असेही देसाई यांनी सांगितले. वाहतूक खाते दहा नवे इंटरसेप्टर्स खरेदी करणार आहे. त्यासाठी निविदा जारी झाली असून पुढील दोन महिन्यांत दहा इंटरसेप्टर्स वाहतूक खात्याच्या ताफ्यात जमा होतील, असे संचालक देसाई म्हणाले.
गोवा हे पर्यटन राज्य असून येथे रोज हजारो नवी वाहने येत असतात. गेल्या वर्षी वाहन अपघातांची संख्या जास्त होती, पण वाहतूक खात्याने केलेल्या विविध उपायांमुळे आता वाहन अपघातांची संख्या खूप घटली आहे, असे आकडेवारी दाखवून देते. रस्त्यांवर बळी जाणा-यांची संख्या कमी झाल्याचे दाखवून देण्यासाठी आपण काही आकडेवारीही जाहीर करू इच्छितो, असे देसाई म्हणाले. 2017 साली जानेवारी ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत गोव्यातील रस्त्यांवर एकूण 3917 वाहन अपघात झाले होते व त्यात एकूण 315 व्यक्तींचे बळी गले होते. यंदा याच कालावधीत म्हणजे जानेवारी ते ऑक्टोबरपर्यंत 3054 वाहन अपघात झाले व 187 व्यक्तींचे बळी गेले. गेल्यावर्षी एका ऑक्टोबर महिन्यात 337 वाहन अपघातांमध्ये 30 व्यक्ती ठार झाल्या होत्या. यंदा ऑक्टोबर महिन्यात 305 अपघात झाले व त्यात 14 बळी गेले. अर्थात अजूनही ब-याच उपाययोजना वाहतूक खाते करील, असे देसाई यांनी नमूद केले.