वाहतूक खोळंबली, लोक भरडले; पर्वरीत वाहतूक कोंडीच्या घटना
By किशोर कुबल | Published: December 17, 2023 02:46 PM2023-12-17T14:46:17+5:302023-12-17T14:46:32+5:30
पर्यटकांच्या वाहनांची गोव्याकडे रीघ.
पणजी : नाताळच्या पार्श्वभूमीवर देशी पर्यटकांनी आपल्या वाहनांनी वीकेंडला मोठ्या संख्येने गोवा गाठला आहे. शनिवारी सायंकाळी पर्वरीत किरकोळ अपघातामुळे मेगा ब्लॉक होऊन महामार्गावर वाहने दोन तास खोळंबली.
लोकांनी अंतर्गत रस्त्यांवरुन जाणे पसंत केल्याने कदंब डेपो परिसर तसेच पर्वरीतील इतर रस्त्यांवरही वाहतूक कोंडी झाली होती. वाहतूक सुरळीत करण्यासाठी पोलिसांना दोन तास लागले. वीकेंड व त्यात नाताळ जवळ आल्याने मुंबई, पुणे, बेळगांव, कोल्हापूर तसेच अन्य भागांमधून देशी पर्यटकांनी गोव्यात गर्दी केली आहे. गोव्याचे किनारे, कॅसिनो गर्दीने फुलले आहेत.
गेल्या दोन दिवसात म्हापसा-पणजी या मार्गावर अनेकदा वाहतूक खोळंबली. यामुळे स्थानिक लोक मात्र भरडले जात आहेत. ‘दामयान दि गोवा’ शोरुमजवळ दोन किरकोळ अपघात घडल्याने कोंडीत आणखी भर पडली आहे. लांबच्या लांब रांगा लागून ठिकठिकाणी वाहनांची कोंडी होत आहेत. कळंगुट, कांदोळी, हणजुण आदी भागातही कोंडीचे प्रकार घडत आहेत.
शनिवारी तर उत्तर गोव्याच्या किनारपट्टीवर मोठ्या प्रमाणात देशी पर्यटक उतरले. नाताळ सण आणि त्यात भर म्हणून वीकेंड त्यामुळे शेजारी राज्यांमधील पर्यटक आपापली वाहने घेऊन मोठ्या संख्येने गोव्यात आलेले आहेत. रेंट ए कार किंवा रेंट ए बाइक घेऊन फिरणाऱ्यांची संख्या लक्षणीय आहे. किनाऱ्यांवर रविवारी सायंकाळपर्यंत तुडुंब गर्दी होती. गेल्या दोन दिवसात दीड लाखाहून अधिक पर्यटक गोव्यात आल्याचा अंदाज आहे.
नववर्षाच्या स्वागतासाठी गोव्यात ठिकठिकाणी पार्ट्यांचे आयोजन आहे. येत्या २८ ते ३० या कालावधीत वागातोर सनबर्न ईडीएम होणार आहे. या डान्स पार्टीलाही हजारोंच्या संख्येने पर्यटक हजेरी लावणार असून वाहतुकीचे आणखी तीन-तेरा वाजण्याची शक्यता आहे. वाहतूक कोंडीची स्थिती पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेली असल्याचे ठिकठिकाणच्या वाहतूक कोंडीवरुन स्पष्ट झाले.