गोव्यात रेशनसाठी आलेल्या धान्याची तस्करी;  एसीबीची कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2019 10:26 PM2019-08-16T22:26:51+5:302019-08-16T22:28:00+5:30

गोदामात उतरविले जात असता दक्षता खात्याच्या लाचलुचपत विरोधी विभागाच्या पथकाने शुक्रवारी पहाटे कोलवाळ येथे धाड घालून रंगेहाथ पकडले.

Trafficking of ration in Goa for ration | गोव्यात रेशनसाठी आलेल्या धान्याची तस्करी;  एसीबीची कारवाई

गोव्यात रेशनसाठी आलेल्या धान्याची तस्करी;  एसीबीची कारवाई

Next

पणजी : गोव्यातील स्वस्त धान्य दुकानांसाठी आलेले तांदूळ, गहू आदी धान्य काळ्या बाजारात विकण्यासाठी कोलवाळ येथे एका खासगी गोदामात उतरविले जात असता दक्षता खात्याच्या लाचलुचपत विरोधी विभागाच्या पथकाने शुक्रवारी पहाटे कोलवाळ येथे धाड घालून रंगेहाथ पकडले. हे धान्य कोल्हापूरकडे वळविण्याचा डाव होता, अशी प्राथमिक माहिती मिळते. 

एसीबीच्या अधिका-यांनी या कारवाईबाबत मात्र कमालीची गुप्तता बाळगली असून, तोंड बंद ठेवले आहे. सूत्रांकडून प्राप्त माहितीनुसार सत्तरी तालुक्यातील स्वस्त धान्य दुकानांसाठी तांदूळ तसेच गव्हाचा हा साठा आला होता, परंतु तो परस्पर कोलवाळ येथे एका खासगी गोदामात वळविण्यात आला. तेथे तो उतरवून घेऊन नंतर वेगळ्या पिशव्यांमध्ये भरून कोल्हापूरकडे रवाना केला जाणार होता. परंतु त्याआधीच ही धाड टाकण्यात आली. कोलवाळ येथे हीरा पेट्रोल पंपच्या मागील बाजूस खासगी गोदाम आहे. पहाटे हे छापासत्र सुरू झाले. 

दरम्यान, लाचलुचपतविरोधी विभागाच्या वरिष्ठ अधिका-यांशी संपर्क साधला असता त्यांनी कोणतीही अधिक माहिती देण्याचे टाळले. भादंविच्या कलम ४0६ आणि भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या कलम १३ खाली गुन्हे नोंदविण्यात आले आहेत, एवढेच सांगण्यात आले. रेशन धान्याचा काळाबाजार करण्याचा असाच प्रकार राज्यात अन्यत्रही चालू होता का, हे तपासण्यासाठी गुप्तता पाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. ‘याक्षणी याबाबत अधिक माहिती देता येणार नाही.’ असे अधिका-यांनी स्पष्ट केले. 

एका वजनदार राजकीय नेत्याच्या दबावाखाली ही कारवाई काही वेळातच गुंडाळण्यात आल्याची चर्चा होती. परंतु एसीबीच्या अधिका-यांनी ती फेटाळून लावली. राज्यात अन्य ठिकाणीही असे प्रकार चालू असण्याची शक्यता आहे त्या अनुषंगाने चौकशी चालू होती, त्यामुळे कारवाईबाबत काही गोष्टी उघड करण्यात आल्या नाहीत, असे सांगण्यात आले. 

गोव्यातील सुमारे ४५0 रेशन दुकानांसाठी तांदूळ व गव्हाचा कोटा भारतीय अन्न महामंडळाच्या वास्को आणि वेर्णा येथील गोदामांमध्ये येतो. हा माल रेल्वे वाघिणींमधून येतो. गहू चंदीगढ, पंजाबहून येतो. हे धान्य नंतर ट्रकांमधून वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये रेशन दुकानांसाठी पाठवले जाते. वरील प्रकरणात भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामातून उचललेला माल प्रत्यक्षात सत्तरी तालुक्यात वितरणासाठी गेलाच नाही, तर तो थेट कोलवाळ येथे खासगी गोदामात नेण्यात आला. तेथून तो वेगळ्या पोत्यांमध्ये भरून काळ्या बाजारात विकण्यासाठी अन्यत्र पाठवला जाणार होता, असा संशय आहे. अधिकारी या दृष्टिकोनातून तपास करीत आहेत. 

Web Title: Trafficking of ration in Goa for ration

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.