अपघातानंतर कुंकळ्ळीत प्रक्षोभ
By admin | Published: May 5, 2015 01:03 AM2015-05-05T01:03:33+5:302015-05-05T01:03:51+5:30
सविस्तर वृत्त असे की, सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चिंचवाडा- आंबावली येथील आलिटो फर्नांडिस (वय २७) हा युवक आंबावलीहून
सविस्तर वृत्त असे की, सोमवारी दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास चिंचवाडा- आंबावली येथील आलिटो फर्नांडिस (वय २७) हा युवक आंबावलीहून कुंकळ्ळीमार्गे आपल्या कामाला जात होता, तर एक मासळीवाहू ट्रक आंबावलीमार्गे कुंकळ्ळी औद्योगिक वसाहतीमधील फिश मिलमध्ये मासळी घेऊन जात होता. सावरकट्टा येथे वाहतुकीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पोलिसांनी रस्त्याच्या मधोमध ठेवलेल्या बॅरिकेडचा अंदाज न आल्याने आलिटो याने आपली मोटारसायकल बाजूला घेतली असता, ट्रकची धडक त्याला बसली. ट्रकच्या पुढील चाकाखाली सापल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला. दरम्यान, त्या ठिकाणी लोक गोळा होऊ लागल्याचे पाहून पोलिसांनी पंचनामा करून युवकाचा मृतदेह व त्याची मोटारसायकल तेथून हलविली. या कृतीला आक्षेप घेत स्थानिकांनी पोलिसांना जाब विचारला. पंचनाम्यात जाणीवपूर्वक त्रुटी ठेवून ट्रकचालकाला वाचविण्याचा पोलिसांचा डाव असल्याचा आरोप करून संतप्त नागरिकांनी युवकाचा मृतदेह घटनास्थळी आणण्याची मागणी केली. त्याचबरोबर पुन्हा पंचनामा करण्याची मागणी लावून धरत पोलिसांशी हुज्जत घातली.
दरम्यान, संतप्त जमावाने अपघाताला कारणीभूत ठरलेल्या ट्रकची तोडफोड केली. तसेच साध्या वेशातील पोलीस शिपायाला जबर मारहाण केली. या पोलिसाला उपचारासाठी नेण्याकरिता आणलेल्या पोलीस व्हॅनवरही दगडफेक करत नुकसान केले. संतापलेल्या लोकांना कुंकळ्ळीचे आमदार राजन नाईक, मडगावचे अतिरिक्त जिल्हाधिकारी आर. परेरा व आंबावलीचे माजी सरपंच डॉ. बाळे यांनी घटनास्थळी जाऊन शांत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांच्याही प्रयत्नाला यश आले नाही. लोकांनी रस्ता रोखून धरल्याने वाहतूकही खोळंबली. शेवटी खवळलेल्या जमावाला काबूत आणण्यासाठी अधिक पोलीस कुमक मागविण्यात आली. मडगावचे पोलीस निरीक्षक सुदेश नाईक, मायणाचे निरीक्षक हरिष मडकईकर व पोलीस उपअधीक्षक मोहन नाईक कुमक घेऊन घटनास्थळी दाखल झाले; मात्र जमावाने आलिटो याचा मृतदेह घटनास्थळी आणण्याची मागणी करत पोलिसांशी हुज्जत घातली. जमावाने कुंकळ्ळीचे पोलीस निरीक्षक राम आसरे व उपनिरीक्षक चव्हाण यांनाही धक्काबुक्की केली.
संतप्त जमावाने मासळीवाहू ट्रकच्या टायरातील हवा काढून ट्रक हलविण्याचा पोलिसांचा प्रयत्न उधळून लावला. काहींनी ट्रकला आग लावण्याचाही प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी तो यशस्वी होऊ दिला नाही. सुमारे चार तास चाललेला प्रक्षोभ आटोक्यात आणण्यासाठी शेवटी पोलिसांनी जमावाला पांगविण्यासाठी अश्रुधुराच्या नळकांड्या फोडल्या. मात्र, संतप्त लोकांनी उशिरापर्यंत ठाण मांडून पोलिसांच्या नाकी दम आणला.
या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालक
शिरगू शेख याला अटक केली आहे. उशिरापर्यंत पोलीस जमावाला समजविण्याचा प्रयत्न करत होते. (प्रतिनिधी)