सारीपाट: नेत्यांची शोकांतिका
By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2023 11:34 AM2023-04-30T11:34:03+5:302023-04-30T11:34:27+5:30
सालष्टोतील मिठी पारोको वगैरे राजकारणी आता राजकीयदृष्ट्या संपल्यात जमा आहेत.
- सद्गुरु पाटील
सालष्टोतील मिठी पारोको वगैरे राजकारणी आता राजकीयदृष्ट्या संपल्यात जमा आहेत. सादिन, चर्चिल, लुईझिन यांच्या सक्रिय राजकारणाचा काळ आता राहिला नाही. सासष्टीतील मतदार या सर्व नेत्यांना कंटाळलेले आहेत. कायतू सिल्वा, बेंजो सिल्वा, आवेर्तान फुर्तादो, क्लाफास डायस यांचेही राजकारण मावळतीला पोहोचले आहे.
चर्चिल आलेमाव यांचे वय आता ७४ आहे. दक्षिण गोव्याचे विद्यमान खासदार फ्रान्सिस सार्दिन यांचे वय ७७ झाले आहे. चर्चिल, सार्दिन किंवा लुईझिन फालेरो हे नेते पोर्तुगीज काळात जन्मले. म्हणजे गोव्यात पोर्तुगीजांची राजवट होती, त्या काळात त्यांचा जन्म झाला. दिगंबर कामतदेखील १९५४ साली जन्मले. कामत आज ६९ वर्षांचे आहेत. २०१४ ची लोकसभा निवडणूक येईल तेव्हा कामत ७० वर्षांचे होतील. लुईझिन फालेरो आज ७२ वर्षांचे आहेत. या सर्वांमध्ये कमी वयाचे आहेत ते विजय सरदेसाई, सरदेसाई यांचा जन्म १९७० सालचा. ते आता ५३ वर्षांचे आहेत. एकंदरीत सार्दिन, चर्चिल, लुईझिन यांच्या सक्रिय राजकारणाचा काळ आता संपला आहे. सार्दिन २०२४ च्या लोकसभा निवडणुकीवेळी ७८ वर्षांचे असतील. समजा ते निवडून आले तर त्यांचा पाच वर्षांचा खासदारकीचा टर्म संपेल तेव्हा ते ८३ वर्षांचे असतील. या वयातदेखील सार्दिन यांना खासदारकी हवी आहे. दक्षिण गोवा लोकसभा मतदारसंघात सार्दिन फिरत नाहीत. लोकांची कामे त्यांच्याकडून होत नाहीत. तरीही त्यांचा दावा पुन्हा कॉंग्रेसच्या तिकिटावर आहे.
राजकारणातून सन्मानाने निवृत्त होण्याचा मार्ग सार्दिनना आणि फालेरो यांनाही मान्य नाही. लुईझिन यांना तृणमूल काँग्रेसची खासदारकी सोडावी लागली. ने पुन्हा काँग्रेस पक्षात येण्याचा व काँग्रेसमध्ये सक्रिय होण्याचा प्रयत्न करतीलच, सासष्टीतील मतदार या सर्व नेत्यांना कंटाळलेले आहेत. विशेषतः लुईझिन, सार्दिन, चर्चिल यांना दक्षिण गोव्यात आता पाठीराखेच नाहीत.
विजय सरदेसाई यांना अजूनही राजकारणात मोठे भवितव्य आहे, पण त्यांना वैचारिक स्थिरता ठेवण्याची गरज आहे. गोवा फॉरवर्ड पक्षाचे संघटनात्मक काम वाढविण्यावर विजय यांना भर द्यावा लागेल. गोवा फॉरवर्ड पक्षाचा विस्तार करावा लागेल. केवळ अवघ्याच व्यक्तीपुरता तो पक्ष मर्यादित ठेवला तर दरवेळी विजय एकटेच विधानसभेत दिसतील. राज्याला प्रभावी, मजबूत, आक्रमक, सरकारविरोधी प्रादेशिक पक्षाची गरज आहे. अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्ष वाढवला, तो पक्ष राष्ट्रीय मान्यतेचा बनला. ममता बॅनर्जी यांनी तृणमूल काँग्रेसचा प्रभाव वाढवत नेऊन त्या पक्षाला पश्चिम बंगालमध्ये सतेवर बसवले. विजयने गोवा फॉरवर्ड पक्ष दक्षिण गोव्यातील मतदारांपुरता जरी मर्यादित ठेवला तरी, फॉरवर्ड हा एक प्रभावी फोर्स ठरू शकतो. मये किंवा पेडणे, मांद्रे असे मतदारसंघ हे गोवा फॉरवर्डच्या प्रोफाईलला व वैचारिक स्थितीला सूट होत नाहीत. विजयची प्रतिमा अजूनही सासष्टीचे नेते अशीच मर्यादित आहे. त्यांना दक्षिण गोव्यातच आपला खरा प्रभाव निर्माण करावा लागेल.
दिगंबर कामत यांच्यावर वारंवार टीका करणे हा पर्याय नव्हे. सरदेसाई यांनी त्या पलिकडे विचार करण्याची वेळ आली आहे. कामत आता भाजपमध्ये पोहोचल्याने थोडे मजबूत झाले आहेत. मात्र कामत काही पुन्हा मुख्यमंत्री होणार नाहीत. मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्याच नेतृत्त्वाखाली त्यांना या वयात काम करावे लागेल. मंत्रीपद दिले तरी चालेल असे कामत यांनी भाजपच्या काही नेत्यांना सांगितले आहे, अशी माहिती मिळते.
सासष्टी तालुक्यात एकेकाळी चर्चिल, सार्दिन, लुईझिन यांचे राज्य असायचे. २००७ साली मुख्यमंत्री झाल्यानंतर कामत यांचा प्रभाव सासष्टीत वाढला. मात्र दुर्दैव असे की, कामत यांना मडगाव मतदारसंघाबाहेरील दुसऱ्या एकाही मतदारसंघात स्वतःचा मोठा प्रभाव निर्माण करता आला नाही. बाबूश मोन्सेरात, विश्वजित राणे किंवा रवी नाईक यांच्याकडेदेखील प्रत्येकी दोन मतदारसंघांमध्ये स्वतःचे कार्यकर्ते किंवा पाठीराखे आहेत. चर्चिलसारखा नेतादेखील कधी बाणावली तर कधी नावेलीत जिंकून येतो. कामत यांनी जर सासष्टीतील दोन-तीन मतदारसंघांमध्ये स्वतःचे प्रभावक्षेत्र निर्माण केले असते तर आज त्यांची राजकीय उंची आणखी मोठी दिसली असती.
विजय सरदेसाई यांनी गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष झाल्यानंतर शिवोली व साळगावमध्ये आपल्या पक्षाचा थोडा तरी प्रभाव तयार केला होता. फातोर्डा व मडगाव अशा दोन ठिकाणी विजयची शक्ती आहेच. अर्थात मडगावमध्ये शक्ती मर्यादित आहे. अनेक वर्षे राजकारणात राहूनदेखील लुईझिन यांना देखील नावेली मतदारसंघाबाहेर स्वतःचे वजन निर्माण करता आले नाही, कधी मुख्यमंत्री तर कधी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष झाले, पण फालेरो नावेली बाहेर आपले कार्यकर्ते तयार करू शकले नाहीत. सार्दिन तर कुडतरी मतदारसंघावर देखील स्वतःचा प्रभाव राखू शकले नाहीत. सासष्टीतील बहुतेक नेत्यांची ही शोकांतिका आहे. सरदेसाई जर स्थिर राहिले व भाजपचे विरोधक म्हणूनच ते प्रामाणिक राहिले तर विजय यांना मानणाऱ्या मतदारांची संख्या सासष्टीत वाढू शकेल. भाजपसोबत एकदा सतेत जाण्याची चूक विजयने केल्यानंतर त्यांच्याबाबत सासष्टीतील मतदारांत रोष निर्माण झाला होता. तरी देखील २०२२ ची निवडणूक सरदेसाई फातोर्चामध्ये जिंकले हे लक्षवेधी आहे.
सासष्टीतील मिकी पाशेको वगैरे राजकारणी आता राजकीयदृष्ट्या संपल्यात जमा आहेत. कायतू सिल्वा, बेंजो सिल्वा, आवेतन फुर्तादो, क्लाफास डायस यांचेही राजकारण संपले आहे. युरी आलेमाव यांनी जर कुंकळ्ळीतील जनतेशी संपर्क व संवाद कायम ठेवला तर त्यांना लांब पल्ला गाठता येईल. सासष्टीतील अनेक राजकारणी मंत्रीपद मिळणार असेल तर काहीही करण्यास तयार असतात. वेळीचे माजी आमदार फिलीप मेरी रॉड्रिग्ज हे याचे उत्कृष्ट उदाहरण आहे. ते अधूनमधून भाजपसोबतच राहिले. मंत्रीपद भोगले, आर्थिकदृष्ट्या बळकट झाले आणि निवडणूक आली की, नावापुरते भाजपविरुद्धच लढले, वेळीतील मतदारांनी काहीवेळा त्यांचा पराभवही केला. कुडतरीचे आमदार आलेक्स रेजिनाल्ड लॉरेन्स यांनाही भाजप सरकारमध्ये मंत्रिपदाची अपेक्षा होती. भाजपने त्यांना ते दिले नाही, रेजिनाल्ड यांना आयडीसीच्या चेअरमनपदावर समाधान मानावे लागले. सासष्टीतील काही नेत्यांची राजकीय शोकांतिका गोमंतकीयांसमोर आहे. यापुढे कामत, विजय किंवा लुईझिन यांचे राजकीय भवितव्य कसे वळण घेते ते पाहणे महत्त्वाचे ठरेल.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"