गोव्यात वरिष्ठ श्रेणी अधिका-यांच्या बदल्या, अजित पंचवाडकर नवे पंचायत संचालक
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2018 06:22 PM2018-03-12T18:22:50+5:302018-03-12T18:22:50+5:30
गोव्यात प्रशासनातील १७ ज्येष्ठ श्रेणी अधिका-यांच्या बदल्यांचा आदेश सोमवारी कार्मिक खात्याने काढला. अजित पंचवाडकर हे नवे पंचायत संचालक आहेत. तर मच्छिमारी खात्याच्या संचालकपदी विनेश आर्लेकर यांना आणण्यात आले आहे.
पणजी : गोव्यात प्रशासनातील १७ ज्येष्ठ श्रेणी अधिका-यांच्या बदल्यांचा आदेश सोमवारी कार्मिक खात्याने काढला. अजित पंचवाडकर हे नवे पंचायत संचालक आहेत. तर मच्छिमारी खात्याच्या संचालकपदी विनेश आर्लेकर यांना आणण्यात आले आहे.
दामोदर शंके यांना छपाई व मुद्रण संचालकपदी, नारायण प्रभुदेसाई यांची सिव्हिल डिफेन्स उपनियंत्रकपदी, श्यामसुंदर परब यांची मध्यवर्ती कारागृह अधिक्षकपदी, विजय परांजपे यांची शिष्टाचार खात्यात अतिरिक्त सचिवपदी, रुही रमेश रेडकर यांची बांधकाम खात्यात प्रशासन संचालकपदी, दीपाली नाईक यांची महिला व बाल कल्याण खात्यात संयुक्त संचालकपदी, संध्या कामत यांची गोवा अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळावर व्यवस्थापकीय संचालकपदी, श्रीमती लावरा ब्रिटो इ माद्रे दे देऊस यांची राज्य पोलिस तक्रार प्राधिकरणावर सचिवपदी, राजन सातार्डेकर यांची हस्तकला महामंडळावर व्यवस्थापकीय संचालकपदी, आशुतोष आपटे यांजे राज्य निबंधकपदी, स्नेहा मोरजकर यांची राजभाषा संचालनालयात संचालकपदी, सुरेंद्र नाईक यांची उत्तर गोवा अतिरिक्त जिल्हाधिकारी-२ या पदी, उमेशचंद्र जोशी यांची जलस्रोत खात्यात प्रशासन संचालकपदी, सिध्दी हळर्णकर यांची पंचायत खात्यात अतिरिक्त संचालकपदी तर श्रीमती शर्मिला झुझार्त यांची औद्योगिक विकास महामंडळात विशेष भूसंपादन अधिकारी या पदी बदली करण्यात आली आहे.
स्नेहा मोजरकर यांच्याकडे कोकणी अकादमीच्या अध्यक्षपदाचा ताबा राहील तसेच मुख्य सचिवांच्या कार्यालयात संयुक्त सचिव म्हणूनही त्या काम पाहतील. छपाई व मुद्रण संचालक अरविंद लोलयेंकर यांना कार्मिक खात्यात संपर्क करण्याचा आदेश देण्यात आला आहे. दीपाली नाईक यांच्याकडे कचरा प्रक्रिया प्रकल्पाच्या विशेष भूसंपादन अधिकारी या पदाचा अतिरिक्त ताबा राहील. श्यामसुंदर परब यांच्याकडे एनआरआय व्यवहार खात्याच्या संचालकपदाचा अतिरिक्त ताबा राहील.
उत्तर जिल्हा पंचायतीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) या पदाचा अतिरिक्त ताबा दशरथ रेडकर यांच्याकडे राहील. वरील सर्व अधिका-यांनी पुढील पाच दिवसांच्या आत नवीन पदाचा ताबा घ्यावा, असे आदेशात म्हटले आहे.
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर हे वैद्यकीय उपचारानिमित्त अमेरिकेत आहेत. त्यांच्या संमतीनेच बदल्यांचा हा आदेश काढण्यात आल्याचे सांगण्यात येते.