गोव्याबाहेरील वरिष्ठ पोलिसांची बदली करा - मायकल लोबो
By ऑनलाइन लोकमत | Published: February 8, 2019 05:27 PM2019-02-08T17:27:37+5:302019-02-08T17:32:42+5:30
महसूल प्राप्तीसाठी गोव्यातील पोलिसांना वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणे सक्तीचे केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे.
म्हापसा - महसूल प्राप्तीसाठी गोव्यातील पोलिसांना वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करणे सक्तीचे केल्याने कायदा व सुव्यवस्था बिघडत चालली आहे. त्यांचा रोष पोलीस महासंचालकावर होता; पण त्यांचे थेट नाव न घेता याला जबाबदार असलेल्या वरिष्ठ पोलिसांची गोव्याबाहेर बदली करावी अशी मागणी उपसभापती मायकल लोबो यांनी केली आहे.
कळंगुट मतदारसंघातील पर्रा गावात झालेल्या एका चोरी प्रकरणी पाहणी करतेवेळी पत्रकारांसोबत लोबो बोलत होते. आपल्या कॅबिनात बसून हे गोव्याबाहेरील वरिष्ठ पोलीस अधिकारी कनिष्ठ अधिकाऱ्यांना चुकीचे आदेश देतात. प्रत्येक कनिष्ठ अधिकाऱ्याला त्यांच्याकडून टार्गेट दिले असून दिलेल्या टार्गेटचे पालन न केल्यास त्यांच्या पगारातून १० हजार रुपये कापून घेण्याचा इशाराही दिला असल्याचे लोबो म्हणाले. कनिष्ठांसमोर पर्याय नसल्याने कायद्याचे पालन करण्यापेक्षा ते फक्त वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करू लागले असल्याचे लोबो म्हणाले. या प्रकारात वाढ झाल्यास लोकांचा पोलिसांवर असलेला विश्वास उडून जाईल व राज्यातील गुन्हेगारी प्रकरणात वाढ होणार असल्याचे पत्रकारांना सांगितले.
पोलीस वरिष्ठांकडून होत असलेल्या या गैरप्रकारावर आपण आवाज उठवत असून सरकारातील १२ ही मंत्री मात्र गप्प बसले आहेत. त्यामुळे त्यांनाही अंधारात ठेवून हे प्रकार केले जात असल्याची माहिती लोबो यांनी दिली. मंत्र्यांनी सुद्धा या गैरप्रकारावर आवाज उठवावा अशीही मागणी यावेळी त्यांनी केली. या प्रकाराची आपण गंभीर दखल घेतली असून राज्याचे गृहमंत्री या नात्याने मुख्यमंत्र्यांना तसेच मुख्य सचिवांना पत्र पाठवणार असून पाठवण्यात येणाऱ्या पत्राची प्रत महासंचालकांना दिली जाणार असल्याचे म्हणाले. तसेच मुख्यमंत्र्यांची भेट घेवून त्यांच्याशी चर्चा सुद्धा करणार असल्याची माहिती दिली. चुकीचे आदेश देणाऱ्यांची बदली करण्याची मागणी पत्राद्वारे केली जाणार असल्याचे सांगितले.
गुन्हेगारी कमी करण्याचे काम पोलिसांचे असते; पण वरिष्ठांकडून दिलेल्या या चुकीच्या आदेशाचे परिणाम पोलिसांवर व्हायला लागले आहेत. १२ तासाहून जास्त ड्युटी करणाऱ्या पोलिसांनी फक्त दंडात्मक कारवाई करण्यासाठी रस्त्यावर उभे राहणे पसंत केले आहे. सुरक्षेवर मात्र दुर्लक्ष होऊ लागले आहे. मानवतेच्या दृष्टीकोनातून त्यांचाही विचार होणे आवश्यक असल्याचे उपसभापती मायकल लोबो म्हणाले.