गोव्यातील प्रदूषण वाढू नये यासाठी वाहतूक खाते उपाययोजना करणार- सुदिन ढवळीकर
By ऑनलाइन लोकमत | Published: March 3, 2019 09:58 PM2019-03-03T21:58:09+5:302019-03-03T22:01:31+5:30
प्रदूषणाच्या समस्येचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानाची मदत घेणार असल्याचे ढवळीकर यांनी सांगितले.
पणजी : दिल्लीत ज्या प्रमाणे वाहनांची संख्या प्रचंड वाढली व प्रदुषणही वाढले, त्याच पद्धतीने नजिकच्या भविष्यात गोव्यातही प्रदूषण वाढू शकते. ते वाढू नये म्हणून गोवा सरकारचे वाहतूक खाते उपाययोजना करेल, असे वाहतूक मंत्री सुदिन ढवळीकर यांनी लोकमतला दिलेल्या मुलाखतीवेळी सांगितले.
गोव्याची लोकसंख्या पंधरा लाख आहे. वाहनांची संख्या बारा लाख झाली आहे. याशिवाय मालवाहू ट्रकसह प्रचंड संख्येने वाहने परप्रांतांमधून येतात. या सर्व वाहनांची यापुढील काळात प्रदूषणाच्या दृष्टीकोनातून काटेकोरपणे तपासणी केली जाईल, असे मंत्री ढवळीकर यांनी सांगितले. गोव्याची स्थिती आम्हाला दिल्लीसारखी होऊ द्यायची नाही. प्रदूषणामुळे दिल्लीत जास्त दिवस राहणेही अनेकजण टाळतात. गोवा हा सुंदर प्रदेश आहे. येथील निसर्ग सौंदर्य जगात प्रसिद्ध आहे. आम्ही गोव्यातील सर्व वाहन प्रदूषण चाचणी केंद्रांचे ऑडिट करून घेऊ, असे मंत्री ढवळीकर यांनी जाहीर केले.
वाहतूक खात्याने नुकतेच गोव्यातील सर्व वाहन ड्रायव्हिंग स्कूल्सचे ऑडिट करून घेतले. पस्तीस स्कूल्स केवळ कागदावरच असल्याचे ऑडिटवेळी आढळून आले. काही ड्रायव्हिंग स्कूल्सचे तर ऑडिटदेखील करता आले नाही. अनेक ड्रायव्हिंग स्कूल्सना कारणे दाखवा नोटिसाही बजाविण्यात आल्या आहेत. नियमांचे पालन न करणाऱ्या ड्रायव्हिंग स्कूल्सचे परवाने निलंबित केले जातील. प्रदूषणाची चाचणी करणाऱ्या केंद्रांचे ऑडिट करून घेतल्यानंतर त्याविषयीचे निष्कर्ष जाहीर केले जातील, असे मंत्री ढवळीकर यांनी स्पष्ट केले.
गोव्यात कोणतेही तंत्रज्ञान हे प्रथम आणले जात असते. जर्मनीहून तंत्रज्ञान आणून साळगाव येथे आधुनिक असा कचरा प्रक्रिया प्रकल्प उभारण्यात आला. फोंडय़ात देखील आधुनिक पद्धतीचे वाहन तपासणी केंद्र उभे केले जाणार आहे. तेही तंत्रज्ञान जर्मनीचे आहे, असे मंत्री ढवळीकर यांनी स्पष्ट केले.