'दूधसागर'चा प्रवास सुलभ; जीपमधून धबधब्याकडे वाहतूक गतिमान
By ऑनलाइन लोकमत | Published: April 23, 2023 10:27 AM2023-04-23T10:27:30+5:302023-04-23T10:28:21+5:30
धबधब्याकडील वाहतूक आता सुरळीत होणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क कुळेः राजधानी पणजीपासून जवळजवळ ६५ किलोमीटर अंतरावर असलेले कुळे गाव आणि तेथून १२ किलोमीटरवर असलेला जगप्रसिद्ध दूधसागर धबधबा याचे आकर्षण सर्वांनाच आहे. या धबधब्याच्या ठिकाणी जीपने जाणे सोयीस्कर व्हावे यासाठी दुधसागर नदीत रॅम्प उभारल्याने धबधब्याकडील वाहतूक आता सुरळीत होणार आहे.
दूधसागर धबधब्याकडे जाण्यासाठी फक्त दोनच मार्ग आहेत. एक म्हणजे रेल्वेमार्ग व दुसरा दूधसागर नदीतून जीपने करायचा प्रवास. रेल्वेमार्गाने एकतर १२ ते १३ किलोमीटर चालत जावे लागते व वेळेवर त्या मार्गावरून रेल्वे गाड्या नसतात. त्यामुळे पर्यटकांना जीपने जावे लागते. दूधसागर धबधबा पर्यटकांसाठी ऑक्टोबर महिन्यात खुला केला जातो व तो मे महिना व जर पाऊस नसेल तर जूनच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत चालू असतो. जीपने जाताना दूधसागर नदी व तिच्या २ उपशाखा पार कराव्या लागतात. दूधसागर टूर ऑपरेटर्सद्वारे वनखात्याकडे नोंदणी केलेल्या ४३१ गाड्यांद्वारे पर्यटकांची ने आण केली जाते. दूधसागर नदीतील लहान-मोठ्या दगडांमुळे जीप चालकांना पर्यटकाना घेऊन जीप चालवणे खूपच मुश्कीलच होत होते. तसेच पाण्याच्या प्रवाहामुळे पुष्कळदा वाहनावर ताबा मिळवणे कठीण होत असे. अनेकदा वाहन नदीच्या पात्रामध्येच बंद पडत असे.
यावर मार्ग काढण्यासाठी सावर्डेचे आमदार तथा गोवा पर्यटन महामंडळाचे अध्यक्ष डॉ. गणेश गावकर यांनी गोवा राज्य सार्वजनिक बांधकाम खात्याच्या सहकार्याने मुख्य नदीपात्रात ८० मी. लांबीचा रॅम्प उभारला. आणखी एक रॅम्प दूधसागर नदीच्या पात्रात उभारण्यात आला. या उपक्रमाला कुळे शिगाव पंचायतचे सरपंच गोविंद शिगावकर व पंचायत मंडळाने सहकार्य केले.
पर्यटकांना भुरळ
सोनावलीम-कुळे येथील दूधसागर धबधब्यामुळे हा परिसर नेहमीच महत्त्वाचा ठरतो. एकदा दूधसागर धबधब्याला भेट देऊन गेलेला पर्यटक परत या ठिकाणी येण्यासाठी संधी पाहत असतो. दरवर्षी लाखोंच्या पटीत देश- विदेशी पर्यटक दूधसागरला भेट देऊन आनंद लुटतात.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"