गोवा - मुरगाव बंदरात आश्रयास आलेले ट्रॉलर्स त्यांच्या राज्यात परतू लागले
By ऑनलाइन लोकमत | Published: December 8, 2017 02:23 PM2017-12-08T14:23:32+5:302017-12-08T14:26:01+5:30
मुरगाव बंदरात आश्रयास आलेले गुजरात, केरळ, कर्नाटकचे ट्रॉलर्स वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर आपापल्या राज्यात परतू लागले आहेत. वादळाच्यावेळी समुद्रात पाण्याची पातळी वाढल्याने तसेच उंच लाटा आणि वाऱ्याचा वेगही वाढला त्यामुळे सुमारे दोनशेहून अधिक परप्रांतीय ट्रॉलर्स गोव्याच्या मुरगाव बंदरात आश्रयास आले होते.
पणजी : मुरगाव बंदरात आश्रयास आलेले गुजरात, केरळ, कर्नाटकचे ट्रॉलर्स वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर आपापल्या राज्यात परतू लागले आहेत. वादळाच्यावेळी समुद्रात पाण्याची पातळी वाढल्याने तसेच उंच लाटा आणि वाऱ्याचा वेगही वाढला त्यामुळे सुमारे दोनशेहून अधिक परप्रांतीय ट्रॉलर्स गोव्याच्या मुरगाव बंदरात आश्रयास आले होते. हवामान आता सुधारल्याने हे ट्रॉलर्स त्यांच्या राज्यात परतू लागले आहेत. मुरगाव मंदिराचे उपाध्यक्ष जी पी राय म्हणाले की, निश्चितपणे किती ट्रॉलर्स परतले हे सांगता येणार नाही. परंतु दोनशेहून अधिक ट्रॉलर्स वादळाच्या काळात मुरगाव बंदरात आश्रयास आले होते. महाराष्ट्र, तमिळनाडूचे ट्रॉलर्स मोठ्या प्रमाणात आले होते. खलाशांना त्यांच्या येथील वास्तव्याच्या काळात तांदूळ, औषध, अन्नपदार्थ पुरविण्यात आले . मुरगाव बंदर प्रशासनाने आणीबाणीच्या उपायोजना केल्या. ट्रॉलर्स वाल्यांना योग्यरीत्या ट्रॉलर्स नांगरता यावे यासाठी सुविधा उपलब्ध करून दिल्या. मुरगाव बंदराचे चेअरमन जयकुमार यांच्या मार्गदर्शनाखाली हे काम हाती घेण्यात आले. मच्छीमारांना योग्य ती मदत पुरवण्यासाठी वेदांता ग्रूप तसेच जिंदाल साउथ वेस्ट पोर्ट लिमिटेड आधी कंपन्यांची मदत घेण्यात आली. अनेक ट्रॉलर्स बंदरातून बाहेर पडले. आज सायंकाळी उशिरापर्यंत सर्व ट्रॉलर्स आपापल्या राज्यात जातील , असे येथील मच्छीमारी खात्याचे अधिकारी म्हणाले.
वास्कोचे उपजिल्हाधिकारी महादेव आरोंदेकर यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले की , या काळात मुरगाव बंदरात अडकलेल्या 40 खलाशांवर निम वैद्यकीय पथकाने उपचार केले. सुमारे 2000 हून अधिक मच्छीमार बंदरात अडकले होते.
दरम्यान या काळात परप्रांतीय मच्छीमारांना त्यांच्या राज्यातील येथील संघटनांच्यावतीने आवश्यक ती मदत करण्यात आली. गोव्यातील मल्याळी केरळ असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी काही मच्छीमारांची रेल्वेने तिरुअनंतपुरम पर्यंत जाण्याची व्यवस्था केली. संघटनेचे सचिव पी सी प्रसाद की, केरळच्या येथे अडकलेल्या मच्छीमारांना आम्ही सर्वतोपरी सहकार्य करीत आहोत. त्यांना त्यांच्या मायभूमीत पाठवण्याची योग्य ती व्यवस्था केली जाईल.