मनोहर पर्रीकर यांच्या उपचारांसाठी प्रसंगी अमेरिकेतूनही डॉक्टर आणणार
By ऑनलाइन लोकमत | Published: February 19, 2018 05:08 PM2018-02-19T17:08:29+5:302018-02-19T21:31:04+5:30
मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यावर मुंबई येथील लीलावती इस्पितळात भाजपातर्फे आणि केंद्र सरकारतर्फेही ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष ठेवले आहे. मनोहर पर्रीकर यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत.परंतू गरज भासल्यास प्रसंगी अमेरिकेतूनही डॉक्टर आणले जाणार आहेत, तशी तयारी सरकारने ठेवली आहे.
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या आरोग्यावर मुंबई येथील लीलावती इस्पितळात भाजपातर्फे आणि केंद्र सरकारतर्फेही ज्येष्ठ मंत्री नितीन गडकरी यांनी लक्ष ठेवले आहे. मनोहर पर्रीकर यांच्यावर तज्ज्ञ डॉक्टर उपचार करत आहेत.परंतू गरज भासल्यास प्रसंगी अमेरिकेतूनही डॉक्टर आणले जाणार आहेत, तशी तयारी सरकारने ठेवली आहे. डॉक्टरांना कुठून आणावे याविषयीचा निर्णय केंद्रीय मंत्री गडकरी हे घेतील, असे पक्ष सुत्रांनी सांगितले.
मनोहर पर्रीकर यांचा आजार बरा होईल असा विश्वास सर्वांनाच आहे. ते उपचारांना ब-यापैकी प्रतिसाद देत आहेत. मुंबईतील लीलावती इस्पितळात त्यांच्या आरोग्याची व्यवस्थित काळजी घेतली जात आहे. काहीच कमी पडू नये म्हणून केंद्रीय मंत्री गडकरी यांचेही स्थितीवर लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही लीलावती इस्पितळाला रविवारी भेट दिली. अमेरिकेत आरोग्य क्षेत्रामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे आणि तज्ज्ञ डॉक्टरही आहेत. स्वादूपिंडाशीसंबंधित (पॅनक्रिया) आजार निश्चितच बरा होऊ शकतो. अमेरिकेसारख्या ठिकाणी तशा आजारांवर उपचार करणारे तज्ज्ञ डॉक्टरही आहेत. पर्रीकर आजारातून लवकर बरे व्हावेत म्हणून केंद्र सरकारकडून व भाजपाकडून शक्य ते सगळे केले जाणार आहे. पर्रीकर यांनी यापूर्वी संरक्षण मंत्री म्हणूनही काम केले आहे. त्यांना प्रसंगी लीलावतीमधून अन्य कोणत्या इस्पितळात उपचारांसाठी न्यावे लागले तर तिथेही नेले जाणार आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार व पर्रीकर कुटुंबीयांशी बोलून मगच संबंधितांकडून योग्य तो निर्णय घेतला जाईल. तोपर्यंत त्यांच्यावर लीलावतीमध्ये योग्य उपचार होत असल्याने अन्यत्र नेण्याचा प्रश्न येत नाही, असे सुत्रांनी सांगितले. पर्रीकर यांचे देशभर हितचिंतक आहेत. ते प्रवृत्तीने फायटर असल्याने पुन्हा बरे होऊन पूर्वीसारखेच राज्याचे नेतृत्व ते करतील, अशी चर्चा भाजपच्या आमदारांमध्येही सुरू आहे.
मनोहर पर्रीकर यांना यापूर्वी आजाराची कल्पना आली नव्हती, अशी चर्चा गोवा प्रदेश भाजपामध्ये आहे. पक्षासाठी व सरकारसाठी काम करताना ते सकाळपासून रात्री उशिरापर्यंत धावपळ करायचे. अलिकडेच मुख्यमंत्र्यांचे दौरे सुरू झाले होते. लोकसभा निवडणुकीची पूर्वतयारी म्हणून मनोहर पर्रीकर एक पूर्ण दिवस विविध मतदारसंघांत घालवायचे. काणकोण, डिचोली व कुडचडे या तीन मतदारसंघांचे दौरे त्यांनी पूर्ण केले होते. भाजपच्या प्रशिक्षण कार्यक्रमातही त्यांनी आठ दिवसांपूर्वी नगरसेवकांना मार्गदर्शन केले होते व यापुढे प्रशिक्षणाचा दुसरा कार्यक्रम येत्या 24 रोजी होणार होता. 24 रोजीचा कार्यक्रम कदाचित पुढे ढकलला जाईल, असे सुत्रांनी सांगितले.