वृक्ष कोसळून तीन बसेस, दोन चारचाकी, एक दुचाकी व एका जेसीबीची झाली मोठी हानी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 4, 2020 10:39 PM2020-07-04T22:39:39+5:302020-07-04T22:39:53+5:30
मुंडव्हेल, वास्को येथे असलेल्या बसस्थानकाच्या पुढच्या बाजूने असलेले ६० वर्षाहून अधिक जुने वृक्ष खाली कोसळले.
वास्को: मुंडव्हेल, वास्को येथे शनिवारी (दि.४) सकाळी १०.३० च्या सुमारास भलेमोठे वृक्ष कोसळून खाली उभ्या करून ठेवलेल्या वाहनांवर कोसळल्याने या वाहनांची मोठी नुकसानी झाली आहे. येथे उभ्या करून ठेवलेल्या तीन खासगी प्रवासी बसेस सह एक चारचाकी, एक दुचाकी तसेच एका जेसीबी मशिनाची बरीच हानी झाली आहे. हे वृक्ष कोसळताना येथे असलेल्या इमारतीच्या दुसºया मजल्याच्या भिंतीला धडकल्याने येथे असलेल्या पाण्याच्या टांकीची तसेच इतर काही गोष्टींची नुकसानी झाली.
शनिवारी वास्को शहरात मूसळधार पावस पडत असताना सदर घटना घडली. मुंडव्हेल, वास्को येथे असलेल्या बसस्थानकाच्या पुढच्या बाजूने असलेले ६० वर्षाहून अधिक जुने वृक्ष खाली कोसळले. याभागात चार प्रवासी बसेस उभ्या करण्यात आलेल्या असून त्यापैंकी तीन बसेसवर सदर वृक्ष कोसळल्याने दोन बसेसचा चक्काचीर झाला तर एका बसची बरीच नुकसानी झाली असल्याची माहीती वास्को अग्निशामक दलाचे अधिकारी दिलीप बिचोलकर यांनी दिली. याबरोबरच येथे असलेल्या दोन चारचाकी व जेसीबी मशिन उभे करण्यात आलेले असून त्यांच्यावरही हे वृक्ष कोसळल्याने एका चारचाकीचा चक्काचूर झाला तर जेसीबी मशिन व अन्य एका चारचाकीची काही प्रमाणात नुकसानी झाली. तसेच एका दुचाकीची याघटनेत नुकसानी झालेली असल्याची माहीती अग्निशामक दलाच्या सूत्रांकडून प्राप्त झाली.
सदर घटनेत नुकसानी झालेल्या त्या तीन खासगी प्रवासी बसेस, एक चारचाकी व जेसीबी मशिन येथेच राहणारे जावेद शेख यांच्या मालकीच्या आहेत. सदर घटनेबाबत अधिक माहीती घेण्यासाठी शेख यांना संपर्क केला असता वृक्ष कोसळून ३ बसेस, एक चारचाकी तसेच जेसीबी मशिनवर कोसळल्याने आपल्याला दहा लाखाहून जास्त नुकसानी सोसावी लागल्याचे सांगितले.
या घटनेत सुदैवाने आपल्या कुटूंबातील सदस्यांना तसेच यापरिसरातून ये - जा करणाºया कोणालाच यामुळे अपघाताच्या सामोरे जावे लागले नसल्याने त्यांनी मोठा अनर्थ टळला अशी प्रतिक्रीया व्यक्त केली. हे झाड कोसळताना येथे असलेल्या इमारतीच्या दुसºया मजल्याच्या भिंतीला धडकल्याने येथे सुद्धा काही प्रमाणात नुकसानी झालेली असल्याचे जावेद शेख यांनी पुढे सांगितले. या घटनेत इमारतीत असलेली पाण्याची टांकी फुटण्याबरोबरच अन्य काही नुकसानी झालेली असल्याचे जावेद यांनी सांगितले.
हे झाड बरेच जुने असून ते कधीही कोसळण्याची भिती निर्माण झाल्याचे काही काळापूर्वी दिसून आल्यानंतर मी येथील मामलेदार कार्यालय तसेच अग्निशामक दलाच्या कार्यालयात जाऊन याबाबत उचित पावले उचलण्याची एक - दोन वेळा मागणी केली होती अशी माहीती जावेद यांनी देऊन त्याबाबत त्यांनी काहीच केले नसल्याचे सांगितले.
सुदैवाने हे झाड कोसळण्याच्या घटनेत कुठल्याच प्रकारची जिवीतहानी झाली नाही, मात्र या घटनेत कोणी जखमी झाला असता तर याला कोण जबाबदार असता असा प्रश्न जावेद शेख यांनी उपस्थित केला. सदर भागातच एक छोटासा गाडा असून वृक्ष कोसळण्याच्या या घटनेत त्या गाड्याची किरकोळ नुकसानी झाली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहीतीनुसार या घटनेत एका इसमाला किरकोळ इजा झाली असून याबाबत माहीती घेण्यासाठी अग्निशामक दलांच्या सूत्रांना विचारले असता त्याबाबत त्यांना माहीती मिळालेली नसल्याचे त्यांनी सांगितले.
हे वृक्ष कोसळल्यानंतर अग्निशामक दलाच्या जवानांनी ते कापून या वाहनांवरून हटवण्याच्या कामाला सुरवात केली. सदर वृक्ष भलेमोठे असल्याने त्यांना ते कापून येथून हटवण्यास बराच त्रास निर्माण होत असल्याचे घटनास्थळावर भेट दिली असता दिसून आले. अग्निशामक दलाच्या जवानांनी हे झाड येथून हटवण्यासाठी एका व्यवस्थापनाशी क्रेन मागवल्याची माहीती सूत्रांकडून प्राप्त झाली. सदर घटनेत कीती मालमत्तेची नुकसानी झाली याबाबत अग्निशामक दलाला विचारले असता योग्य चौकशी केल्यानंतरच ते स्पष्ट होणार असे त्यांनी माहीतीत सांगितले.