Manohar Parrikar Death: स्वतःच्या शेवटच्या ट्विटमध्ये पर्रीकर म्हणतात...
By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2019 08:33 AM2019-03-18T08:33:53+5:302019-03-18T09:00:52+5:30
एक आयआयटीयन इंजिनीअर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर शेवटपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होते.
पणजी- एक आयआयटीयन इंजिनीअर असलेले गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर शेवटपर्यंत सोशल मीडियावर सक्रिय होते. ट्विटरवरून ते नेहमीच कार्यरत असायचे. त्यांनी शेवटचं ट्विट पाच दिवसांपूर्वी केलं होतं. विशेष म्हणजे शेवटच्या ट्विटमध्येही पर्रीकरांनी भाऊसाहेब नावानं प्रसिद्ध असलेले गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद बांदोडकर यांची आठवत काढत त्यांना श्रद्धांजली अर्पण केली होती.
भाऊसाहेबांच्या जयंतीनिमित्त पर्रीकरांनी लिहिलं होतं की, गोव्याचे पहिले मुख्यमंत्री दयानंद(भाऊसाहेब) बांदोडकरांना जयंतीनिमित्त श्रद्धांजली अर्पण करतो. गोव्याच्या प्रगतीचा मजबूत पाया रचण्यासाठी भाऊसाहेब यांनी अमूल्य योगदान दिलं आहे. भाऊसाहेब हे महाराष्ट्रवादी गोमांतक पार्टीचे नेते होते, ते 1963मध्ये गोव्याचे पहिले मुख्यमंत्री झाले. त्यानंतर 1973पर्यंत लागोपाठ तीन वेळा ते गोव्याचे मुख्यमंत्री राहिले. भाऊसाहेब यांच्या निधनानंतर त्यांची मुलगी शशिकला काकोडकर यांना मुख्यमंत्री करण्यात आलं. ज्या गोव्याचे एकमेव महिला मुख्यमंत्री राहिल्या आहेत.
Tributes to Goa's first Chief Minister Dayanand (Bhausaheb) Bandodkar on his birth anniversary. We remember his invaluable contribution in building a strong foundation for Goa's progress.
— Manohar Parrikar (@manoharparrikar) March 12, 2019
गोव्याचे मुख्यमंत्री व भारताचे माजी संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर यांनी रविवारी संध्याकाळी अखेरचा श्वास घेतला. ते स्वादुपिंडाशी संबंंधित कर्करोगाशी झुंज देत होते. त्यांचे वय ६३ वर्षे होते. काही वर्षांपूर्वीच त्यांच्या पत्नीचेही कर्करोगाने निधन झाले होते. त्यांच्या मागे दोन पुत्र, सुना, नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्या निधनामुळे सोमवारी राष्ट्रीय दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी, सरचिटणीस प्रियांका गांधी, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, भाजपाध्यक्ष अमित शहा, उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, उत्तर प्रदेशचे राज्यपाल राम नाईक, काँग्रेसचे लोकसभेतील नेते मल्लिकार्जुन खरगे, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यासह विविध पक्षांच्या नेत्यांनी त्यांच्या निधनाबद्दल दु:ख व्यक्त केले आहे.