शिवजयंतीच्या बॅनरवरुन गोव्यातील वाळपईत वातावरण तंग
By admin | Published: February 19, 2017 12:46 AM2017-02-19T00:46:11+5:302017-02-19T00:46:11+5:30
शिवजयंतीचे बॅनर काढण्यावरून वाळपईत वातावरण तंग झाले असून शनिवारी रात्री सुमारे ५०० शिवप्रेमींनी वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा नेला.
Next
>ऑनलाइन लोकमत/दशरथ मांद्रेकर
वाळपई, दि. 19 - शिवजयंतीचे बॅनर काढण्यावरून वाळपईत वातावरण तंग झाले असून शनिवारी रात्री सुमारे ५०० शिवप्रेमींनी वाळपई पोलीस स्थानकावर मोर्चा नेला. बॅनर काढणा-याला अटक करा. अन्यथा पोलीस स्थानकावरून जाणार नाही, अशी मागणी करत रात्री उशिरापर्यंत शिवप्रेमी पोलीस स्थानकासमोर ठाण मांडून होते.
शनिवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास शिवजयंतीच्या निमित्ताने वाळपई शिवजयंती समितीचे पदाधिकारी हातवाडा येथे शिवजयंतीचे बॅनर लावत होते. त्यावेळी एका समुदायाच्या युवकांनी बेकायदेशीरपणे बॅनर लावत असल्याची तक्रार वाळपई पोलीस स्थानकात दिली. वाळपई पोलिसांनी त्या ठिकाणी येऊन बॅनर लावू नका आणि या संदर्भात पोलीस निरीक्षकांशी संपर्क साधा, असे सांगितले. शिवजयंती समितीचे पदाधिकारी वाळपईचे पोलीस निरीक्षक दीपक पेडणेकर यांच्याशी बोलण्यासाठी गेले असता, तक्रार करणा-या समुदायाच्या युवकांनी बॅनर्सची विटंबना केली. त्यामुळे प्रकरण चिघळले आणि वाळपई पोलीस स्थानकावर शिवप्रेमींनी धडक दिली.
पालिका मुख्याधिका-यांची पोलिसांत तक्रार...
पालिका क्षेत्रात अज्ञात इसमांनी बेकायदेशीरपणे बॅनर लावल्याची तक्रार वाळपई पालिकेच्या मुख्याधिकारी सिंथिया पिंटो यांनी वाळपई पोलीस स्थानकात दिली.
शिवजयंती समितीची तक्रार...
वाळपईत शिवजयंतीनिमित्त लावलेले बॅनर काढल्याची तक्रार शिवजयंती समितीने वाळपई पोलिस स्थानकात दिली असून कारवाई करण्याची मागणी केली आहे. शिवजयंती कार्यक्रमास मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन समितीने केले आहे.