ट्रोजन डिमेलो : जॅक सिक्वेरांच्या पुतळ्याबाबत गोवा फॉरवर्ड ठाम, सर्व आमदारांना पटवून मुद्दा पटवून देऊ
By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2018 08:00 PM2018-01-23T20:00:27+5:302018-01-23T20:00:38+5:30
माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जॅक सिक्वेरांच्या पुतळ्याच्या विषयावर नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्यावर केलेल्या आरोपांचा गोवा फॉरवर्डचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी समाचार घेतला आहे. गोवा फॉरवर्डने तगादा लावल्याने पार्सेकर सरकारचे काही निर्णय नव्या सरकारने बदलले त्यामुळे वैफल्यग्रस्ततेतून त्यानी आरोपसत्र चालविल्याचा दावा डिमेलो यांनी केला.
पणजी : माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर यांनी जॅक सिक्वेरांच्या पुतळ्याच्या विषयावर नगरनियोजनमंत्री विजय सरदेसाई यांच्यावर केलेल्या आरोपांचा गोवा फॉरवर्डचे मुख्य प्रवक्ते ट्रोजन डिमेलो यांनी समाचार घेतला आहे. गोवा फॉरवर्डने तगादा लावल्याने पार्सेकर सरकारचे काही निर्णय नव्या सरकारने बदलले त्यामुळे वैफल्यग्रस्ततेतून त्यांनी आरोपसत्र चालविल्याचा दावा डिमेलो यांनी केला. विधानसभा संकुलाच्या आवारातच सिक्वेरांचा पुतळा बसवावा, ही पक्षाची मागणी कायम आहे, त्यासाठी आम्ही सर्व आमदारांना मुद्दा पटवून देऊ, असे त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेत डिमेलो म्हणाले की, ‘विधानसभेच्या आवारात अन्य कोणत्याही पुतळ्याला विरोध करण्याचे धोरण भाजपाने घेतल्याने गोवा फॉरवर्ड नाराज आहे परंतु ते त्या पक्षाचे धोरण आहे. गोवा फॉरवर्डही संसदीय व्यवहार समितीची बैठक घेऊन आपले धोरण ठरविणार आहे. पार्सेकर यांना सरदेसाई इतकी वर्षे पुतळ्याच्या प्रश्नावर गप्प का होते, असा विचारण्याचा अधिकार नाही. सरदेसाई हे ‘गोंय, गोंयकार आणि गोंयकारपण’ यासाठी सातत्याने लढा देत आहेत.
राजकीय वनवास पत्करावा
पार्सेकर यांनी त्यांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दित अनेक वादग्रस्त निर्णय घेतले. माडाला गवताचा दर्जा देऊन स्वैर कत्तलीचा मार्ग मोकळा केला. गुंतवणूक प्रोत्साहन मंडळाच्या माध्यमातून नको असलेले प्रकल्प मंजूर केले. गोवा फॉरवर्डने सत्तेत येताच माडाला झाडाचाच नव्हे तर राज्य वृक्ष म्हणून दर्जा दिला. आयपीबीचे नको असलेले प्रकल्प रद्द करुन घेतले त्यामुळे पार्सेकर हे गोवा फॉरवर्डवरील नाराजी व्यक्त करण्यासाठीच वैफल्यग्रस्ततेतून सरदेसाई यांच्यावर आरोप करीत सुटले आहेत. पार्सेकर यांचे बहुतांश निर्णय चुकले. मांद्रेतील लोकांनाही ते न्याय देऊ शकले नाही म्हणून त्यांचा ७ हजारांच्या मताधिक्क्याने पराभव झाला. आजवर कुठल्याही मुख्यमंत्र्यावर एवढ्या मोठ्या मताधिक्क्याने पराभव पत्करण्याची नामुष्की आली नव्हती. पार्सेकर यांनी खरे तर राजकीय वनवास पत्करण्याची गरज आहे.
दोन प्रमुख मागण्या मान्य
ट्रोजन म्हणाले की, जॅक सिक्वेरांच्या पुतळ्याबाबतची मागणी मान्य झालेली नसली तरी सार्वमतदिन ‘अस्मितायदिन’ म्हणून सरकारी पातळीवर साजरा करण्याची तसेच सार्वमताचा इतिहास शालेय अभ्यासक्रमात लावण्याची अशा दोन मागण्या पूर्ण झालेल्या आहेत. सिक्वेरा यांच्या पुतळ्याची मागणीही पूर्ण करुन घेऊ, त्यासाठी सर्व आमदारांना मुद्दा पटवून देऊ, असे त्यांनी सांगितले.
मोपा पीडीए पार्सेकरांच्याच काळात
मोपा पीडीएची निर्मिती पार्सेकरांच्या काळातच झाली आणि त्यांच्या काळातच अधिसूचना काढली हे ते सोयिस्करपणे विसरत आहेत, असा आरोप करुन आता मोपा पीडीएला विरोध करण्याची गरज नाही, असे डिमेलो म्हणाले.