गोव्यातील घोडेव्हाळ अपघात प्रकरणातील ट्रकचालकाची रवानगी न्यायालयीन कोठडीत
By सूरज.नाईकपवार | Published: March 20, 2024 05:57 PM2024-03-20T17:57:14+5:302024-03-20T17:58:40+5:30
मडगाव: गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हायातील घोडेव्हाळ बेंदुर्डे येथील अपघात प्रकरणात कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केलेला ट्रकचालक राकेश गोरे याची रवानगी ...
मडगाव: गोव्यातील दक्षिण गोवा जिल्हायातील घोडेव्हाळ बेंदुर्डे येथील अपघात प्रकरणात कुंकळ्ळी पोलिसांनी अटक केलेला ट्रकचालक राकेश गोरे याची रवानगी न्यायालयीन कोठडीत करण्यात आली. पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्याला न्यायालयात उभे केले असता, चौदा दिवसांची न्यायालयीन कोठडी त्याला सुनावण्यात आली. नंतर त्याला कोलवाळ येथील तुरुगांत पाठवून देण्यात आले.
मागच्या शनिवारी रात्री अपघाताची वरील भीषण घटना घडली हाेती. संशयिताने दारुच्या नशेत ट्रक चालविताना त्याचा वाहनावरील ताबा सुटल्याने हे वाहन सुमारे दहा मीटर दरीत कोसळले होते. त्यात देवराज सातनी व हस्कु सातनी या सासरा सुनेला मृत्यू आला होता. या ट्रकमध्ये चालक, क्लीनर, पाच लहान मुलांसह एकूण अन्य बाराजण होते.
मंगळूरुहून हा ट्रक काजूच्या बिया घेउन कोल्हापूरला निघाला होता. अपघातात मृत पावलेले व जखमी झालेले त्याला मंगळुरु येथे मिळाले होते. ते फुगे विक्रेते असून, मूळ गुजरात राज्यातील होते. ते घरी जाण्यासाठी निघाले होते. पैशाच्या हव्यासापोटी संशयिताने त्यांना आपल्या ट्रकमध्ये घेतले होते.