स्मार्ट सिटीकडून तुळशी वृंदावनालाही नुकसान; इतिहास अभ्यासकांकडून निषेध
By ऑनलाइन लोकमत | Published: January 12, 2024 01:39 PM2024-01-12T13:39:41+5:302024-01-12T13:39:59+5:30
पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या या बेजबाबदार कामांमुळे सांतिनेज येथे असलेल्या कदंबकालीन तुळशी वृंदावनाला नुकसान केले.
नारायण गावस
पणजी: पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या या बेजबाबदार कामांमुळे सांतिनेज येथे असलेल्या कदंबकालीन तुळशी वृंदावनाला नुकसान केले. याचा इतिहास अभ्यासक प्रा. प्रजल साखरदांडे, तसेच महेश म्हांबरे व पणजी महानगर पालिकेचे माजी नगरसेवक ॲल्ड्रीन बासालियो यांनी निषेध केला. पणजीच्या ऐतिहासिक वारसा स्थळांचे संवर्धन करण्यासाठी पूर्ण स्मार्ट सिटीच्या कामाचे ऑडिट होणे गरजेचे आहे, अशी मागणी यावेळी त्यांनी केली.
पणजीत सुरु असलेल्या स्मार्ट सिटीच्या कामाचे कुठेच याेग्य नियोजन केले जात नाही. सर्वत्र रस्ते खाेदले आहेत. या अगोदर एका युवकाचा या खड्ड्यात पडून मृत्यू झाला होता. तसेच अनेक वेळा रस्त्यावरील खड्ड्यात लाेकांच्या गाड्या पडून अपघात झाले आहेत. सर्वत्र बेशिस्तपणे रस्ते खाेदले आहेत. आता वारसा स्थळांचेही नुकसान केले जात आहे. सांतिनेज येथे असलेले हे तुळशी वृंदावन १२ व्या शतकातील आहे. प्रत्येक तुळशीविवाह दिवशी हिंदू तसेच काही ख्रिस्त बांधवही एकत्र येऊन तुळशी विवाह साजरा करतात. पण स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी येथे काम करताना या वृंदावनालाही न पाहता त्याचे नुकसान केले. या तुळशी वृंदावनाचा इतिहास खूप मोठा आहे, असे प्रा. प्रजल साखरदांडे यांनी सांगितले.
संपूर्ण स्मार्ट सिटीचे ऑडिट गरजेचे : महेश म्हांबरे
पणजीतील सर्व वारसास्थळांचे संवर्धन करण्यासाठी पणजी स्मार्ट सिटीच्या सुरु असलेल्या कामांचे संपूर्ण ऑडिट हाेणे गरजेच आहे. पणजीत स्मार्ट सिटीचे काम करतात तेथे कुठेच योग्य नियोजन केले जात नाही. मिळेल तिथे खाेदले जात असून त्यांना लाेकांचे काही पडलेले नाही. या कामाच्या स्थळी स्मार्ट सिटीचे अधिकाऱ्यांकडूनही याेग्य पाहणी केली जात नाही. येथे सर्वत्र अंदाधुंद काम येथे सुरु आहे. पणजीतील लोकांना तसेच पणजीत येणाऱ्या लोकांना याचा त्रास सहन करावा लागत आहे. आता त्यांच्यांकडून पणजीतील वारसा स्थळ असलेल्या तुळशी वृंदावनाचे नुकसान केेले याचा आम्ही निषेध करतो, असे महेश म्हांबरे म्हणाले.