श्री देव बोडगेश्वर मंदिर चोरी प्रकरणी दोघांना अटक; मंदिरातील पैशाची पेटी फोडली
By काशिराम म्हांबरे | Published: February 28, 2024 01:11 PM2024-02-28T13:11:36+5:302024-02-28T14:28:44+5:30
म्हापसा येथील प्रसिद्ध तसेच जागृत असे देवस्थान श्री देव बोडगेश्वर मंदिरात आज बुधवारी पहाटेच्या दरम्यान झालेल्या चोरीचा छडा अवघ्या तासात पोलिसांनी लावला आहे.
म्हापसा: काशिराम म्हांबरे
म्हापसा येथील प्रसिद्ध तसेच जागृत असे देवस्थान श्री देव बोडगेश्वर मंदिरात आज बुधवारी पहाटेच्या दरम्यान झालेल्या चोरीचा छडा अवघ्या तासात पोलिसांनी लावला आहे. या प्रकरणात दोघा संशयितांना पोलिसांकडून अटक करण्यात आली आहे. चोरट्यांनी मंदिराच्या प्रांगणातील स्तंभावर ठेवलेली काचेची पादुका पेटी फोडून त्यातील रक्कम चोरली होती. संशयितांच्या अटकेनंतर पोलिसांनी चोरलेली रक्कमही चोरट्यांकडून ताब्यात घेतली आहे.
संशयितांना अटक करण्यासाठी पोलिसांना विशेष पथकाची स्थापना केली होती. त्यानंतर मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारावर सागर शिंदे ( वय ४०, कर्नाटक ) तसेच आनंद एस नाईक ( वय ४० बेळगांव- कर्नाटक ) यांना अटक करण्यात आली.
म्हापसा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चोरीची घटना पहाटे ४.३० वाजण्याच्या अंदाजाला घडली होती. तेथील सुरक्षा रक्षक झोपला असता चोरीचा प्रकार घडलेला. दोन चोरटे मंदिराच्या परिसरात शिरले. प्रांगणात ठेवण्यात आलेल्या काचेच्या आच्छादनावर चोरट्यांनी दांडा हाणून पेटी फोडली. पेटीवर दांडा हाणल्याने झालेल्या आवाजातून सुरक्षा रक्षकाला जाग आली. त्यांने लगेच आरडा ओरड सुरु केला. या गडबडीत चोरट्यांनी तेथे दांडा टाकून पळ काढला. पळून जाताना हाताला मिळतील तेवढ्या नोटा गोळा करुन पलायन केलेहोते. घटनेची माहिती नंतर पोलिसांना देण्यात आलेली. पोलिसांनी पंचनामा करून गुन्हा नोंद केला होता.
सुमारे महिनाभरापूर्वी देवाची जत्रा संपन्न झाली होती. या संबंधी पोलिसात तक्रार दाखल करण्यात आल्याची माहिती देवस्थानचे अध्यक्ष आनंद भाईडकर यांनी दिली. तपासासाठी पोलिसांनी देवस्थानच्या परिसरातील सीसीटिव्ही फुटेजचा वापर केला होता. पुढील तपास कार्य सुरु करण्यात आले आहे.