दोन बडे वाहतूक अधिकारी गोत्यात?
By admin | Published: September 10, 2015 02:00 AM2015-09-10T02:00:38+5:302015-09-10T02:00:48+5:30
पणजी : वाहतूक संचालनालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेला शिपाई दामू गावडे याने पणजी प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या
पणजी : वाहतूक संचालनालयात लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आलेला शिपाई दामू गावडे याने पणजी प्रथम न्याय दंडाधिकाऱ्यांपुढे दिलेल्या कबुली जबाबात वाहतूक खात्याच्या दोन बड्या अधिकाऱ्यांची नावे घेतली. त्यामुळे या दोन्ही अधिकाऱ्यांच्या अटकेची शक्यता निर्माण झाली आहे. या लाच प्रकरणात वाहतूक संचालक अरुण देसाई व उपसंचालक विश्राम गोवेकर हे सूत्रधार असल्याचे तक्रारदाराने आपल्या तक्रारीत म्हटले होते.
वाहतूक खात्याच्या निरीक्षकाकडेच ५ लाख रुपयांची लाच मागण्याचे धाडस करणाऱ्या वाहतूक खात्याच्या दोन बड्या अधिकाऱ्यांचे धाबे दणाणणारा कबुली जबाब या प्रकरणी अटक करण्यात आलेला खात्याचा शिपाई दामू गावडे याने बुधवारी पणजी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यापुढे नोंदविला आहे. सीआरपीसी १६४ अंतर्गत नोंदविण्यात आलेल्या या कबुली जबाबात गावडे याने या लाच प्रकरणातील सूत्रधारांची नावे सांगितली आहेत.
ज्यांच्याकडे ही लाच मागण्यात आली होती, त्या अॅलिस्टर फर्नांडिस यांनी ‘एसीबी’कडे केलेल्या तक्रारीत आपल्याकडे वाहतूक संचालक देसाई व उपसंचालक गोवेकर यांनी लाच मागितल्याचे म्हटले होते. गावडे यांच्या कबुली जबाबात दोन अधिकाऱ्यांचीच नावे असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आली. (प्रतिनिधी)