पर्रीकरांसह भाजपाचे दोन आमदार अंथरुणास खिळलेले
By ऑनलाइन लोकमत | Published: November 20, 2018 08:28 PM2018-11-20T20:28:52+5:302018-11-20T20:29:12+5:30
मगोपचा याचिकेतून न्यायालयास माहिती; तिघेही बहुमत सिध्द करण्यासाठी विधानसभेत उपस्थित राहण्याच्याही परिस्थितीत नसल्याचा दावा
पणजी : मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर तसेच भाजपचे दोन आमदार फ्रान्सिस डिसोझा आणि पांडुरंग मडकईकर हे बरा न होणाऱ्या असाध्य आजाराने अंथरुणास खिळलेले आणि बहुमत सिध्द करण्यासाठी ते विधानसभेत उपस्थित राहण्याच्याही परिस्थितीत नाही, अशी माहिती सरकारात घटक असलेल्या मगोपने हायकोर्टाला आपल्या याचिकेमधून दिली आहे. ही याचिका खरे तर सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे यांचे राजीनामे स्वीकारण्याच्या कृतीला आव्हान देणारी आहे. परंतु त्यात वरील उल्लेख आलेला आहे आणि सत्ताधारी भाजपसाठी ते बरेच अडचणीचे ठरले आहे.
काँग्रेसला बहुमताचा किंवा सरकार स्थापनेचा दावा करता येऊ नये यासाठी भाजपने काँग्रेसचे दोन आमदार फोडले असेही या याचिकेत म्हटले आहे. मगोपचे नेते सत्यवान पालकर व इतरांनी सादर केलेल्या याचिकेत सभापती प्रमोद सावंत यांनी या दोघांचे राजीनामे स्वीकारण्याची जी कृती केली ती रद्दबातल ठरवावी, तसेच या दोघांना पुढील सहा वर्षांकरिता निवडणूक लढविण्यास बंदी घालावी व कोणतेही लाभाच्या पदापासून वंचित ठेवावे, अशी मागणी केली आहे. शिरोडकर हे सध्या आर्थिक विकास महामंडळाचे (ईडीसी) तर सोपटे हे पर्यटन विकास महामंडळाचे (जीटीडीसी) अध्यक्ष आहेत.
‘सरकार स्थापनेनंतर मुख्यमंत्री पर्रीकर हे असाध्य आजाराने त्रस्त बनले. गोमेकॉत, विदेशात तसेच दिल्लीतही त्यांच्यावर वैद्यकीय उपचार केले गेले. फ्रान्सिस डिसोझा तसेच मडकईकर हेही बरेच दिवस इस्पितळात होते. वास्कोचे आमदार कार्लुस आल्मेदा हेही आजारी आहेत आणि राज्याची राजकीय स्थिती विचित्र बनली असल्याचे याचिकेत म्हटले आहे. विधानसभेचे अधिवेशन बोलावले तरी या आजारी आमदारांना किंवा मुख्यमंत्र्यांना विधानसभेत उपस्थिती लावणे अशक्य होईल, असेही नमूद करण्यात आले आहे.
या याचिकेत निवडणूक आयोगाचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्याला प्रतिवादी केले असून सभापती प्रमोद सावंत, सुभाष शिरोडकर व दयानंद सोपटे हेही पक्षकार आहेत. याचिकेत असेही म्हटले आहे की, ‘ सत्ताधाऱ्यांना कोणत्याही परिस्थितीत काँग्रेसकडे सत्ता गेलेली नकोय.
दरम्यान, मगोपचे अध्यक्ष दीपक ढवळीकर यांनी पर्रीकर आजारातून बरे होईपर्यंत मुख्यमंत्रीपदाचा हंगामी ताबा सुदिन ढवळीकर यांच्याकडे द्यावा, अशी मागणी याआधीच केलेली आहे. सत्तेसाठीचे युध्द विधानसभेत बहुमत सिध्द करण्यापर्यंत पोचले तर भाजपला सुरक्षित राहण्यासाठी बरेच डावपेच करावे लागतील. मगोपच्या याचिकेतील काही गोष्टींनी भाजपला बरेच अडचणीत आणले आहे. या याचिकेत असेही नमूद करण्यात आले आहे की, शिरोडकर आणि सोपटे यांनी राजीनामे देऊन भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर दोघांनाही वजनदार महामंडळे देऊन बक्षिसीही देण्यात आलेली आहे.
३८ सदस्यीय विधानसभेत भाजप आणि काँग्रेसकडे प्रत्येकी १४ आमदार आहेत. मगोप आणि गोवा फॉरवर्डकडे प्रत्येकी ३ तर अपक्ष ३ आमदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसकडे १ आमदार आहे.