चोपडे-शिवोली पुलावरील भीषण अपघातात बाप-लेक जागीच ठार
By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2019 12:27 PM2019-06-16T12:27:49+5:302019-06-16T13:21:19+5:30
संतप्त जमावांनी महाराष्ट्र नोंदणीकृत संशयितांची गाडी पेटविली
म्हापसा : उत्तर गोव्यातील बार्देश तालुक्यातील चोपडे-शिवोली पुलावर झालेल्या भीषण अपघातात मोरजीतील ख्रिश्चन कुटुंबियातील बाप व लेक असे दोघे जागीच ठार झाले. तर उर्वरित चौघांवर गोमेकॉत उपचार सुरू आहेत. अपघातास कारणीभूत ठरलेल्या महाराष्ट्रातील चारचाकीला संतप्त स्थानिकांकडून आग लावून पेटवून दिली. त्यामुळे पुलावर अर्धातास आगीचे लोट अन् धुर पसरला होता. त्यानंतर अग्निशामक दलाने धाव घेऊन ही आग विझवली. पुलावर मोठा पोलीस फौजफाटा ठेवण्यात आला होता.
घटनेनंतर पुलावरील वातावरण तंग होते. अपघातानंतर स्थानिकांनी पुलावरील दोन्ही बाजुने वाहतूक रोखून धरली होती. दरम्यान, पोलिसांनी महाराष्ट्रातील संशयित पाचजणांना ताब्यात घेऊन पुलावरील वाहतूक तब्बल पाच तासानंतर सुरळीत केली. जुआंव फर्नांडिस (६२), जुडास फर्नांडिस (२५) अशी मयताची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, हा अपघात आज रविवारी (दि.१६) सकाळी ६.४५ वाजता घडला. फर्नांडिस कुटुंबीयातील चार सदस्य व त्यांचे इतर दोन मित्र सर्वजण राहणारे (विठ्ठदासवाडा-मोरजी) आहेत.
हे कुटुंबिय शिवोलीतील चर्चमध्ये फेस्तनिमित्त प्रार्थनेसाठी जाताना हा अपघात घडला. संशयितांच्या गाडीने विरोधी दिशेने येत असलेल्या मयताच्या गाडीला जोरदार ठोकर दिली. हा अपघाताची तीव्रता भीषण होती की याचा आवाज आसपासच्या घरापर्यंत गेला. अपघातानंतर संशयितांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यानंतर जमलेल्या लोकांनी जखमींना त्वरित १०८ गाडीतून जिल्हा इस्पितळात नेले व तिथून त्यांना गोमेकॉत हलविण्यात आले. पुलावरून जाताना बसला ओव्हरटेक करण्याच्या नादात विरोध दिशेने येणाऱ्या या गाडीला त्यांनी ठोकर मारली.
अपघातानंतर बराचवेळ पुलावर पोलिस व स्थानिकांमध्ये बाचाबाची व वाद सुरू होता. अपघातील सर्व संशयितांनी ताब्यात घेऊन त्यांना पुलावर आणण्याची मागणी स्थानिकांनी लावून धरली होती. मात्र, उत्तर गोवा पोलीस अधीक्षक आयपीएस चंदन चौधरी व म्हापसा पोलीस स्थानकाचे निरीक्षक कपिल नायक, हणजूण पोलीस ठाण्याचे निरीक्षक नवलेश देसाई व इतर पोलिस अधिकारी हे जमावाची समजूत काढण्यात शर्तीचे प्रयत्न करीत होते. यावेळी काहीजण गर्दीचा फायदा घेत पोलिसांनी शिवीगाळ व टोमणेबाजी करीत होते.
दरम्यान, पोलिसांकडून सर्व संशयितांची नावे व त्यांच्यावर कडक कारवाईचे आश्वासन मिळाल्यानंतर जमावाने वाहतूक खुली केली. त्यानंतर पोलिसांनी क्रेनच्या मदतीने दोन्ही अपघातग्रस्त गाड्या पुलावरून बाजुला करीत वाहतूक सुरळीत केली.