अंजुणे धरणाचे दोन दरवाजे खुले अतिरिक्त पाणी सोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2018 11:10 PM2018-07-26T23:10:24+5:302018-07-26T23:10:25+5:30
डिचोली-अंजुणे धरणाने ९० मीटरच्यावर पाण्याची पातळी गाठल्याने धरण अधिकाऱ्यांनी आज धरणाचे दोन दरवाजे खुले करून पाणी सोडले
म्हापसा : डिचोली-अंजुणे धरणाने ९० मीटरच्यावर पाण्याची पातळी गाठल्याने धरण अधिकाऱ्यांनी आज धरणाचे दोन दरवाजे खुले करून पाणी सोडले असून कष्टी व वाळवंटी नदीच्या किना-यावरील नागरिकांनी नदीच्या परिसरात वावरताना सतर्क रहावे, असे आवाहन केले आहे. आज सकाळी दोन दरवाजे खुले केले असून ३.६० क्युसेस पाणी सोडले जात आहे.
धरणाची पूर्ण क्षमता ९३.२ मीटर असून ९० च्या वर धरणाची पातळी गेल्याने सुरक्षततेचा उपाय म्हणून पाणी सोडले जात आहे. यंदा मोठ्या प्रमाणात पावसाने झोडपल्याने गेल्या वर्षाच्या तुलनेत यंदा एक दिवस अगोदरच धरण भरत आले असे सांगण्यात आले. कारापूर, केरी, पर्ये आदी भागातील लोकांनी सतर्क राहावे असे आवाहन करण्यात आले आहे. धरण परिसरात पावसाची नोंद आता आपर्यंत २५४० मिमीच्या आसपास असून वरील पट्ट्यात पावसाचा जोर चालूच आहे असे सांगण्यात आले. या ठिकाणी धरण परिसरात सर्व ती काळजी घेतली जात असल्याचे अभियंते जी. पवाडी यांनी सांगितले. आमठाणे धरणाची पातळी काही दिवसापूर्वीच भरली असून पाण्याचा विसर्ग सुरु झालेला आहे. यंदा गेल्यावर्षीच्या तुलनेत किमान १५ दिवस अगोदरच धरणे भरली आहेत.