सनबर्नप्रश्नी भाजपमध्ये दोन गट; मंत्री-आमदारांत चलबिचल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 30, 2024 12:22 PM2024-11-30T12:22:44+5:302024-11-30T12:22:44+5:30

प्रदेशाध्यक्षांनाही सरकारने विश्वासात घेतले नाही

two factions in bjp over sunburn festival issue and movement among ministers and mla | सनबर्नप्रश्नी भाजपमध्ये दोन गट; मंत्री-आमदारांत चलबिचल

सनबर्नप्रश्नी भाजपमध्ये दोन गट; मंत्री-आमदारांत चलबिचल

लोकमत न्यूज नेटवर्क, पणजी: सनबर्नचे आयोजन धारगळ येथे करण्याबाबत आयोजक आणि सरकारमधीलही काही नेते ठाम आहेत. सर्व सरकारी यंत्रणा सध्या लगबगीने काम करत असून सनबर्न धारगळमध्येच व्हावा म्हणून सरकारचा आटापिटा सुरू आहे. हे करण्यापूर्वी भाजप प्रदेशाध्यक्षांना देखील सरकारने विश्वासात घेतलेले नाही. भाजपमध्ये या प्रश्नावरून दोन गट तयार झाले आहेत. धारगळमधील लोकांनी सनबर्नविरुद्ध दंड थोपटल्याने काही मंत्री-आमदारही चलबिचल झाले आहेत.

पेडणेचे आमदार तसेच माजी आमदार तसेच त्या मतदारसंघातील काही पंच, माजी सरपंच वगैरे या विषयाबाबत लोकांसोबत राहिले आहेत. त्यांनी धारगळला सनबर्न नको अशी भूमिका घेतली आहे. सनबर्नचे आयोजन हे वागातोर, कांदोळी, कळंगुटसारख्या किनारपट्टीत केले तर कुणाला आक्षेप असत नाही. तिथे हजारो पर्यटक मोठ्या संगीताच्या तालावर हवे तसे झिंगले तरी, कुणाची तक्रार असत नाही, कारण तो भाग म्हणजे पर्यटन हब आहे. मात्र स्थानिकांशी तसेच लोकप्रतिनिधींशी चर्चा न करता सरकारने थेट धारगळला सनबर्न आयोजित करण्यास रान मोकळे करून देण्याचे ठरविल्याने वाद सुरू झाला आहे.

भाजपच्या कार्यकर्त्यांत या विषयावरून दोन गट आहेत. आमदार आर्लेकर यांनी सनबर्न होऊ देणार नाही, अशी भूमिका पूर्वीच जाहीर केली आहे. काही नगरसेवक, काही पंच सदस्य यांच्यातही चलबिचल सुरू झाली आहे. गोवा सरकार भारतीय संस्कृती रक्षणाच्या गप्पा लोकांना सांगते, पण ज्या भागात संस्कृतीप्रेमी हिंदू लोकांची संख्या जास्त आहे तिथेच सनबर्न आयोजित करू देण्यास दारे उघडी करून दिली जातात. वास्तविक सनबर्नसाठी जागा सरकारनेच सुचविली असल्याची चर्चा लोकांमध्ये आहे. जागा सुचविणे हे सरकारचे काम नव्हे ते काम सनबर्न आयोजकांनी करायचे असते. पण यावेळी सरकारमधील काहीजणांचा अतिउत्साह धारगळच्या लोकांच्या लक्षात आला आहे.

भाजप कोअर टीमला कल्पनाच नाही

दरम्यान, सनबर्न धारगळला आयोजित करायचा असेल तर सरकारने अगोदर भाजप कोअर टीमची बैठक बोलवून त्यात माहिती द्यायला हवी होती, असे काही सदस्य बोलू लागले आहेत. पूर्वी काही विषयांवर पेडण्यातच सरकारला माघार घ्यावी लागलेली आहे. कोअर टीमला विश्वासात न घेता सरकार मोठा इव्हेंट धारगळला आयोजित करण्यास का तत्त्वतः मान्यता देते, असा प्रश्न उपस्थित होऊ लागला आहे. सरकारने अलिकडे भापज कोअर टीमशी बोलणेच टाळतेय. यापुढे बैठक होईल तेव्हा कोअर टीममध्ये याचे पडसाद उमटणार आहेत.

महोत्सव होऊ देणार नाहीच : नाईक

पंच भूषण उर्फ प्रदीप नाईक म्हणाले की, धारगळ ग्रामसभेत या महोत्सवाला विरोध झालेला आहे. आज पाच पंच सदस्य उपस्थित नाहीत म्हणून पूर्ण गाव नाही, असे होत नाही. त्यामुळे या महोत्सवाला पूर्ण गावाचा विरोध असून असला महोत्सव धारगळ पंचायत क्षेत्रात आम्ही कदापही होऊ देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.

लोकांचा विरोध असेल तर नको : बाबू 

पर्यटन खाते पूर्वी सांभाळलेले माजी उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर म्हणाले की, सनबर्नला माझा विरोध नाहीं पण धारगळ येथे सनबर्न आयोजित करण्यास जर लोकांचा विरोध असेल तर माझा देखील विरोध असेल. मी याबाबत लोकांबरोबर आहे. पण सरकारने कुठे सनबर्न व्हायला हवा व कुठे तो होऊ नये हे नीट ठरवायला हवे. ईडीएममध्ये ड्रग्ज मिळतात असे जर कुणी म्हणत असेल तर ड्रग्ज़विरोधी पाऊले उचलणे ही सरकारची जबाबदारी आहे, असेही आजगावकर म्हणाले.

सरकारकडून फोनाफोनी 

धारगळमध्ये एका कसिनो मालकाची मोठी जमीन आहे. त्या कसिनो व्यवसायिकाने सनबर्न आयोजित करण्यासाठी आकारमानाच आपली जागा द्यावी म्हणून काहीजणांकडून फोनाफोनी झाली. कसिनो व्यवसायिकाने चोवीस तासांत एनओसी द्यावी म्हणून सरकारने प्रयत्न केले व सरकारी प्रयत्नांना यश आले.
 

Web Title: two factions in bjp over sunburn festival issue and movement among ministers and mla

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.