लाच प्रकरणी दोन फॉरेस्ट गार्ड निलंबित
By पूजा प्रभूगावकर | Published: May 24, 2024 01:49 PM2024-05-24T13:49:12+5:302024-05-24T13:49:50+5:30
याबाबतचा आदेश खात्याने शुक्रवारी जारी केला.
पूजा नाईक प्रभूगावकर, पणजी: वन खात्याकडे असलेली फाईल मंजुर करुन घेण्यासाठी म्हापसा येथील एका व्यवसायिकाकडे लाच मागणाऱ्या दोन फॉरेस्ट गार्ड संदीप मांद्रेकर व प्रसाद तेली यांना वन खात्याने सेवेतून निलंबित केले आहे. याबाबतचा आदेश खात्याने शुक्रवारी जारी केला.
म्हापसा येथील व्यवसायिक प्रितेश देसाई यांच्याकडे या दाेघा फॉरेस्ट गार्ड यांनी लाच मागितल्याचा आरोप आहे. देसाई यांनी यांच्याविरोधात वन खात्याकडे या प्रकरणी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार या तक्रारीची दखल घेत त्या दोघांना सेवेतून निलंबित केल्याची माहिती वन खात्याचे मंत्री विश्वजीत राणे यांनी दिली.
देसाई यांनी आपल्या एका कामाविषयीची फाईल वन खात्याच्या कार्यालयात मंजुरीसाठी पाठवली आहे. सध्या ही फाईल खात्याअंतर्गत प्रलंबित आहे. सदर फाईल मंजुर करुन देण्यासाठी फॉरेस्ट गार्ड संदीप मांद्रेकर व प्रसाद तेली यांनी देसाई यांच्याकडे संपर्क साधला व ठरावीक रक्कम लाच म्हणून देण्याची मागणी केली. देसाई यांनी या दोघांविरोधात लाच मागत असल्याची तक्रार वन खात्याकडे केल्यानंतर मांद्रेकर व तेली यांना निलंबित केले आहे. या दोघांची चौकशी केली जाईल असे मंत्री राणे यांनी सांगितले.