गोव्यात मटका प्रकरणी विरोधी पक्षनेते बाबू कवळेकरांची दोन तास चौकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2017 07:22 PM2017-09-22T19:22:07+5:302017-09-22T19:22:39+5:30
पणजी, दि. २२ - गोव्यात विरोधी पक्षनेते बाबू कवळेकर यांची मटका साहित्य घरात सापडल्या प्रकरणी सीआयडी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी शुक्रवारी तब्बल दोन तास चौकशी केली. ‘माझा या प्रकरणात काहीही संबंध नाही. घर भाऊ बाबल याच्या नावावर आहे. तोच अधिक माहिती देऊ शकेल,’ असे पालूपद कवळेकर यांनी चौकशीच्यावेळी चालू ठेवले. या प्रकरणात त्यांचा बंधू बाबल कवळेकर याला समन्स काढण्यात आले असून, सोमवारी चौकशीसाठी बोलावले आहे. दरम्यान, कवळेकर यांना मडगांव सत्र न्यायालयात अंतरिम जामीन मंजूर झाला आहे.
मटका साहित्याच्या प्रकरणात आपल्याला काहीच माहीत नाही अशी ‘नरोवा कुंजरोवा’ची भूमिका बाबू यांनी गुन्हे शाखेच्या अधिका-यांसमोर घेतली. घर भावाच्या नावावर आहे, हेच उत्तर ते प्रत्येक प्रश्नाला देत होते. आपण नेहमीच कामात व्यस्त असतो. अशा अवैध गोष्टी आपण करुच शकत नाही. आपल्याकडे त्यासाठी वेळही नसल्याचे एका प्रश्नावर त्यांनी तपास अधिका-याला सांगितल्याची माहिती सूत्रांनी दिली.
बुधवारी गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बाबूंच्या बेतुल येथील निवासस्थानी धाड घालून हजारो मटका स्लिप तसेच तत्सम साहित्य जप्त केले होते. त्यानंतर त्यांना चौकशीसाठी हजर राहण्यासाठी समन्स बजावण्यात आले होते. रायबंदर येथील सीआयडी गुन्हे शाखेत दाखल झाल्यानंतर दुपारी १२.१५ वाजता कवळेकर निरीक्षक विश्वेश कर्पे व अन्य अधिका-यांच्या उपस्थितीत त्यांची चौकशी सुरु झाली. दुपारी २ वाजेपर्यंत चौकशी चालू होती. मडगांव सत्र न्यायालयाने मंजूर केलेल्या अटकपूर्व जामिनाचा आदेश घेऊनच बाबू आले होते.
काहीही चुकीचे केलेले नाही : कवळेकर
पोलिसात हजर होण्याआधी बाबू कवळेकर पत्रकारांशी बोलताना म्हणाले की, ‘ चौकशीसाठी पोलिस अधिका-यांना मी पूर्णपणे सहकार्य करीत आहे. माझ्याकडे लपविण्यासारखे काही नाही. मी काहीही चुकीचे केलेले नाही. न्यायदेवतेवर माझा पूर्ण विश्वास आहे.’