वर्षभरात अडीच कोटींचे सोने जप्त, पण तरीही ते हिमनगाचे टोकच...
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2018 05:22 PM2018-12-26T17:22:26+5:302018-12-26T17:22:32+5:30
सुवर्ण तस्करीच्या गुन्हेगारी घटनात आतापर्यंत दुहेरी आकडा गाठणा-या दाबोळी विमानतळावर मंगळवारी पुन्हा एकदा 31 लाखांचे सोने कस्टमने पकडल्याने पुन्हा हा विमानतळ चर्चेत आला.
- सुशांत कुंकळयेकर
मडगाव: सुवर्ण तस्करीच्या गुन्हेगारी घटनात आतापर्यंत दुहेरी आकडा गाठणा-या दाबोळी विमानतळावर मंगळवारी पुन्हा एकदा 31 लाखांचे सोने कस्टमने पकडल्याने पुन्हा हा विमानतळ चर्चेत आला. यंदा या विमानतळावर सुवर्ण तस्करीच्या एकूण दहा घटना उघडकीस आल्या असून तब्बल अडीच कोटींचे सोने पकडण्यात कस्टम अधिका-यांना यश आले. असे जरी असले तरी खात्रीलायक सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे, ज्या प्रमाणात सुवर्णाची तस्करी केली जाते त्या मानाने उघडकीस आलेल्या घटना केवळ एक ते दोन टक्केच असाव्यात.
मंगळवारी एअर इंडियाच्या कुवेतहून आलेल्या चेन्नईला जाणा-या विमानाची कस्टमने झडती घेतली असता दोन प्लास्टिकच्या पिशव्यात लपवून ठेवलेले 1 किलो 86 ग्राम सोने त्याच्याकडे सापडले. या सोन्याची किंमत 31 लाख रुपये होती. हे सोने शौचालयात लपवून ठेवले होते. दाबोळी विमानतळावर चढणारा प्रवासी हे सोने घेऊन चेन्नईला उतरवून नेणार होता, असा संशय कस्टम अधिका-यांनी व्यक्त केला आहे.
जानेवारी ते डिसेंबर या दरम्यान अशा प्रकारच्या तब्बल दहा घटना घडल्या असून, यापैकी चार घटनात अशाच प्रकारे शौचालयात सोने लपवून नेण्याचा प्रयत्न केला होता. याशिवाय सोने तस्करीच्या वेगवेगळ्या क्लृप्त्याही उघडकीस आल्या. एप्रिल महिन्यात दुबईहून गोव्यात आलेल्या एका दाम्पत्याकडून 26.40 लाख रुपयांचे सोने पकडले होते. या दाम्पत्याने सोन्याची तस्करी करण्यासाठी सोन्याच्या तारेने कपडय़ावर जरीसारखे विणकाम केले होते. जून महिन्यात अशाच प्रकारे 28.62 लाखांचे सोने पकडले असता, हे सोने सेफ्टी जॅकेट पाऊचमध्ये लपवून ठेवण्यात आले होते. 24 सप्टेंबर रोजी एका प्रवाशाकडून 13 लाखांचे सोने पकडले होते. या प्रवाशाने आपल्या बुटाच्या तळव्यात हे सोने लपवले होते.
दाबोळी विमानतळावर सर्वात मोठा सोन्याचा साठा 24 जुलै रोजी पकडण्यात आला होता. या विमानतळाच्या वॉश रुममध्ये टीश्यू डिस्पेन्सरमध्ये 97 लाखांचे सोने लपवून ठेवले होते. 25 सप्टेंबर रोजी विमानाच्या टॉयलेट बॉक्समध्ये 26.60 लाखांचे सोने लपवून ठेवण्यात आले होते. तर 19 नोव्हेंबर रोजी 13.90 लाखांचे सोने सहा लहान लहान प्लास्टिकच्या पिशव्यात लपवून ठेवलेले कस्टम अधिका-यांना आढळले होते.
कस्टम अधिकारीही सामील?
सूत्राकडून मिळत असलेल्या माहितीप्रमाणे, सुवर्ण तस्करीच्या केवळ एक दोन टक्केच घटना उघडकीस येत असून 98 टक्के प्रकरणात सोने किंवा इतर माल सहीसलामत स्मगल केला जातो. याचे कारण म्हणजे कस्टमचेच काही अधिकारी या सुवर्ण तस्करांना सामील असतात. या विधानाची सत्यता 18 ऑक्टोबर रोजी दाबोळी विमानतळावर डीआरआयच्या अधिका-यांनी दाबोळी विमानतळाच्या कार्गो विभागात 2 कोटींच्या तस्करी करून आणलेल्या सिगारेटस् पकडल्या होत्या. या प्रकरणात विमानतळावरील 5 कार्गो कर्मचा-यांना अटक करण्यात आली होती. त्याशिवाय एका कस्टम खात्याच्या उपायुक्ताच्या घरावर छापाही टाकला होता. मात्र या प्रकरणातील सर्व संशयितांना न्यायालयाकडून नंतर जामीन मिळाला.
कासरगोड-केरळच्या नागरिकांचा वापर
या तस्करीसाठी कासरगोड व केरळ येथील नागरिकांचा तस्करांच्या टोळीकडून वापर केला जातो अशीही माहिती संबंधित सूत्रांकडून मिळाली आहे. तस्कराची टोळी या नागरिकांना आखाती देशात बोलावून घेते. तेथे त्यांना तीन दिवस राहण्याची व्यवस्था केली जाते. जाताना त्यांच्याकडे तस्करीचा माल दिला जातो. या तस्करीवर त्या नागरिकांना कमिशनही दिले जाते. कदाचित या प्रवाशांना पकडले तर त्यांना त्वरित जामीन मिळण्याची तजवीजही केली जाते. आखाती देशात विशेषत: दुबईत असलेली सोन्याची किंमत आणि भारतातील किंमत यात मोठी तफावत असल्यामुळे तसेच सोन्याच्या आयातीवर दहा टक्के अबकारी कर भरावा लागत असल्यामुळे त्यातून सुटण्यासाठी सर्रास ही तस्करी केली जाते, अशीही माहिती हाती लागली आहे.